मुंबईकरांना लवकरच प्रवास होणार सुसाट

मुंबईकरांना लवकरच प्रवास होणार सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक सांधणारा तब्बल अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा दुसरा बो आर्च स्ट्रिंग गर्डर यशस्वीपणे बुधवारी सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी बसवण्यात आला. तब्बल अडीच हजार मेट्रिक टन वजनाच्या गर्डरची जोडणी म्हणजे अभियांत्रिकी आविष्कारच होता. गर्डर सांधण्याचे काम पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसांत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.
गेल्या महिन्यात प्रस्तावित कोस्टल आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गावरील पहिला महाकाय बो आर्च स्ट्रिंग गर्डरने सांधण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी पहाटे सहा वाजून सात मिनिटांनी दुसरा गर्डरदेखील यशस्वीपणे स्थापन करण्यात महापालिकेला यश आले आहे. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने गर्डर एकमेकाला जोडण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.
पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरक्त महापालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
पहाटे तीन वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसविलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे सहा वाजून सात मिनिटांनी अडीच हजार मेट्रिक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली.
हवामानानुसार अंदाज घेत गेल्या २६ एप्रिल रोजी पहिली तुळई स्थापन करण्यात आली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसरी तुळई स्थापन करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पथकाचा आत्मविश्वास दुणावला होता. पहिल्या गर्डरचा अंदाज घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या गर्डरपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरी गर्डर स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते; परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली.
...
जपानी तंत्रज्ञानाचा वापर
मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सी लिंकदरम्यान स्थापन केलेल्या दोन्ही गर्डरवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये, यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
…..
अडीच हजार मेट्रिक टन वजन
कोस्टल रोडवर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या गर्डरपेक्षा तुलनेने दुसरी तुळई ही वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई ३१.७ मीटर रुंद, ३१ मीटर उंच आणि १४३ मीटर लांब आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाना) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवारी सकाळी दुसरी गर्डर घेऊन तराफा निघाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com