सुरक्षेच्या नावाखाली मेट्रो दोन तास बंद

सुरक्षेच्या नावाखाली मेट्रो दोन तास बंद

सुरक्षेच्या नावाखाली मेट्रो दोन तास बंद
घाटकोपरसह सर्वच स्थानकांत गर्दी, प्रवासी हैराण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : घाटकोपर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळी तब्बल दोन तास जागृती नगर ते घाटकोपर स्थानकादरम्यानची मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्याचा फटका उर्वरित मेट्रो सेवेला बसल्याने पंधरा-वीस मिनिटांनी एक गाडी धावत होती. त्यामुळे सायंकाळी घरी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सर्वच स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवासी मेट्रो प्रशासन आणि पंतप्रधानांच्या रोड शोबाबत संताप व्यक्त करत होते.
जागृती नगर स्थानक ते घाटकोपरदरम्यान सायंकाळी सहा ते पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो सेवा स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दुपारी पावणेतीन वाजता ‘एक्स’वर दिली. त्यानुसार सायंकाळी सहा वाजता प्रशासनाने घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर असलेले शटर बंद केले. आयत्यावेळी मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली.
मेट्रोकडून दर साडेतीन मिनिटाला एक गाडी चालवली जाते. मात्र जागृती नगरपर्यंतच गाड्या जात असल्याने पंधरा-वीस मिनिटांनी एक गाडी धावत होती. त्यामुळे मेट्रो स्थानकात पाय ठेवायलाही जागा नव्हती. दरम्यान, याबाबत मेट्रो वनकडे विचारणा केली असता सायंकाळी सहा ते पावणे सात या वेळेत जागृती नगर-घाटकोपर ही सेवा बंद होती, उर्वरित मार्गावर नेहमीप्रमाणे गाड्या धावत असल्याचा दावा त्यांनी केला.

जागृती नगर-घाटकोपर पायपीट
मेट्रो- वनने दररोज तीन-चार लाख प्रवासी ये-जा करतात. मेट्रो बंद असल्‍याने अंधेरी-वर्सोवा या दिशेकडून घाटकोपरकडे निघालेल्या प्रवाशांना जागृती नगर स्थानकात उतरावे लागले. एकाचवेळी प्रवाशांचा लोंढा येत असल्याने येथून घाटकोपरला जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांना पायपीट करत घाटकोपर गाठवे लागले.

आयत्यावेळी घोषणा का?
सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने आयत्या वेळी का मेट्रो बंद ठेवली, एक दिवस अधिक का जाहीर केले नाही, असा सवाल प्रथमेश शिरवाडकर या प्रवाशाने सोशल मीडियावर केला आहे. पंतप्रधानांना प्रचार करता यावा, म्हणून ही कोंडी केली का, असाही प्रश्‍न त्‍याने विचारला आहे.

सोशल मीडियावर संताप
प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत मेट्रो प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईत सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती अत्यंत बिकट असताना मेट्रो बंद ठेवून केला जाणारा प्रचार काय कामाचा, असा सवाल प्रशांत ननावरे या प्रवाशाने केला. मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नेहमीच प्रवासी हाल सहन करतात. त्यात आणखी भर का घालता, अशा शब्दांत मुकेश मखाजिया या प्रवाशाने संताप व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com