

ग्वालियरच्या मॉडेलवर तुलसी एक्सप्रेसमध्ये बलात्कार?
आरोपींचा शोध घेण्याचे ठाणे रेल्वे पोलिसांसमोर आव्हान
ठाणे शहर, ता. २१ (बातमीदार) : धावत्या एक्सप्रेसमध्ये एका मॉडेलवरील बलात्काराच्या घटनेचा शोध घेणे, ठाणे रेल्वे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. पीडित मॉडेलने मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे दाखल केलेल्या बलात्काराच्या तपासात ठाणे रेल्वे पोलिसांना अनेक त्रुटी आणि तफावती आढळून येत आहेत. तसेच या तपास कामात पीडितेकडून पोलिसांना योग्य सहकार्य मिळत नसल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण झाले आहे.
पीडित तरुणीने ग्वालियर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार १० मार्च रोजी ती ग्वालियरला जाण्यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून तुलसी एक्सप्रेसच्या बी २ या बोगीत बसली होती. गाडी सुटल्यानंतर सुमारे ४० मिनिटांनी तिला कोणीतरी गुंगीचा पदार्थ खायला दिला. त्यानंतर काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच अत्याचार करतानाचे व्हिडीओ तयार केले. ही तक्रार दाखल करण्यासाठी पीडित तरुणीने ३९ दिवसांचा अवधी घेतला. तसेच याबाबत कोणाकडेही वाच्यता केली नाही. तसेच कोणताही डॉक्टरांकडून तपासणीही करून घेतली नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार ग्वालियर पोलिसांनी भारतीय दंड विधान ३७६ आणि ३२८ अन्वये गुन्हा दाखल करून हा गुन्हा ठाणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला. तो वर्ग करण्यासाठीही तेथील पोलिसांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे या घटनेचा तपास करण्यात ठाणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी कसून तपास सुरू केला आहे. पीडितेच्या जबाबानुसार दुसाने यांनी घटना घडल्याच्या दिवशी तुलसी एक्सप्रेसच्या बोगी बी २ मधील आरक्षणाच्या तक्त्यावरील तसेच याच प्रकारच्या गोरखपूर, कुशिनगर एक्स्प्रेस या मिळत्याजुळत्या गाड्यांमधील आरक्षित तक्त्यातील नावाचा शोध घेतला; मात्र पीडित तरुणीने या गाड्यांनी प्रवास केला नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. शिवाय तुलसी एक्स्प्रेस ही गाडी घटनेच्या दिवशी गंतव्य स्थानापासून सुटण्यास सुमारे २० मिनिटांचा उशीर झाला होता. त्यानंतर ४० मिनिटांनी ही गाडी ठाणे स्टेशन क्रॉस करून कल्याणला पोहोचल्याचे समोर आले; मात्र पीडित तरुणीने गुन्हा ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे म्हटल्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीला ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात तपासासाठी बोलावले असता तिच्याकडून येथे येण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलिस ग्वालियरला जाऊन तिच्याकडून आणखी सविस्तर माहिती घेणार आहेत.
पीडित तरुणी सांगत असल्याप्रमाणे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याचा छडा लावण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. आमचे पथक तपासाच्या कामाला लागले आहे. त्यासाठी जीआरपी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. पीडित तरुणीने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे रेल्वे पोलिस स्टेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.