

ठाणे शहर, ता. २१ (बातमीदार) : आगीची घटना घडलीच, तर रुग्णालयातील मनोरुग्णांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे, यासाठी मॉक ड्रिल घेऊन याबाबतचे प्रशिक्षण ठाणे अग्निशमन दलाने रुग्णालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. ठाणे मनोरुग्णालयात सध्या आठशेहून अधिक महिला आणि पुरुष मनोरुग्ण उपचार घेत आहेत. आगीसारख्या घटनेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे ज्ञान या रुग्णांना नसल्याने त्यांच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असते.
रुग्णालयात आगीच्या घटना वाढत आहेत. अहमदनगर, धुळे, भांडुप येथील रुग्णालयात आगी लागून मोठ्या जीवितहानीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटनांतून बोध घेणे आवश्यक आहे; मात्र काही रुग्णालय प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून ते वेळोवेळी रुग्णालयातील रुग्णांच्या जीविताची काळजी घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच रुग्णालयामध्ये आगीचे मॉक ड्रिल घेण्यात आले. रुग्णालयातील आगप्रतिबंधक साधनांचा वापर कसा करायचा, याची येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात माहिती देण्यात आली.
रुग्णालयात सुमारे ३२३ महिला मनोरुग्ण आणि ४९८ पुरुष मनोरुग्ण उपचार घेत आहेत. महिला कर्मचाऱ्यांनाही अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेत महिला रुग्णांना कसे सुरक्षित बाहेर काढायचे, याबाबत धडे दिले. फायर अलार्म सिस्टीम, हायड्रंट सिस्टीम, स्मोक डिटेक्टर, फायर कंट्रोल पॅनेल आदी उपकरणे हाताळण्याची माहितीदेखील सगळ्यांना देण्यात आली. अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनाचे प्रशिक्षण व मॉकड्रिलमध्ये आग प्रतिबंधात्मक कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, काळजी घ्यावी, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून उपकरणे कशा प्रकारे वापरावीत, याचा कर्मचाऱ्याकडून सराव करून घेतला. या प्रशिक्षणाच्या वेळी डॉ. नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक, बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंता श्रीमती भालवी, उपअधीक्षक डॉ. प्राची चिवटे व वैद्यकीय अधिकारी आणि सर्व संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयात आगीची दुर्घटना घडलीच, तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. रुग्णालयात दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधली आहे. धोक्याच्या वेळी अग्निशमन दल येईपर्यंत उपस्थितांनी कोणती खबरदारी घ्यायची, कोणती उपकरणे आणि कशी हाताळायची, काय करायचे, काय करायचे नाही, याची माहिती दिली. या सर्व प्रशिक्षणाचा आम्हाला चांगला उपयोग होणार आहे.
- डॉ. नेताजी मुळीक, मनोरुग्णालय अधीक्षक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.