शेवटच्या एका तासांत पालटले चित्र

शेवटच्या एका तासांत पालटले चित्र
Published on

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा ५०.१२ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत सहा टक्के मतदान वाढले आहे. २०१४ व २०१९ मध्ये अनुक्रमे ४२.८८ व ४४.२१ टक्के मतदान झाले होते. यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघात ५० टक्के मतदान झाल्याने हा वाढीव मतांचा टक्का विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे. उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढली असून याचा फायदा विजयी उमेदवारास मताधिक्य वाढविण्यासाठी होतो का, हे आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत आहे. महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी (ता. २०) लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यंदा कल्याण लोकसभेत ५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यापूर्वी कल्याण लोकसभेत मतदानाचा आकडा हा ३४ टक्के ते ४५ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. यंदा मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी तशी फारशी दिसत नव्हती; मात्र शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का वाढला. कल्याण लोकसभेत २० लाख मतदारांची नोंद आहे. यातील किती मतदार मतदानासाठी बाहेर पडतात, यासाठी निवडणूक आयोगापासून राजकीय पक्षांचीदेखील कसोटी लागली होती.

मतदान केंद्रावर असणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे नागरिक हैराण होते. तसेच मतदार यादीत नाव न सापडल्याने अनेक मतदार मतदान न करताच माघारी फिरले. यामुळे दुपारी तीननंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसत होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मतांची टक्केवारी कमी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरून तडक कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर निघाले. प्रत्येक प्रभागात जाऊन पदाधिकाऱ्यांकडून धावता आढावा घेत मतदारांना बाहेर काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीदेखील कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदारसंघाचा आढावा घेत जास्तीत जास्त मतदान करण्याच्या सूचना केल्या. यामुळे एका तासात कल्याण लोकसभेतील चित्र पालटले. शेवटच्या तासात चक्क १० टक्क्यांनी मतांचा आकडा वाढल्याचे चित्र दिसून आले.

२००९ मध्ये कल्याणमध्ये ३४ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ४२.९४ टक्के मतदान झाले होते; तर २०१९ मध्ये ४४.२७ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी १.३३ टक्क्यांनी वाढ झाली होती. २०१४ व २०१९ चे मतदान पाहता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. २०१९ ला राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना दोन लाख १५ हजार मते मिळाली होती, तर श्रीकांत शिंदे यांना पाच लाख ५८ हजार मते मिळाली होती. तीन लाखांच्या लीडने शिंदे यांनी विजय मिळविला होता. यंदा मतदारांच्या संख्येसोबतच मतदानाच्या टक्केवारीतदेखील वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी, मनसे, भाजपची भक्कम साथ
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यंदा शिवसेनेत फूट पडली असून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. यामुळे शिवसैनिकांचा कौल नेमका कोणत्या गटाकडे आहे, हेदेखील निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट होणार आहे. शिंदे यांना राष्ट्रवादी, मनसे, भाजप यांची साथ मिळाली असल्याने जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळविण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचे पारडे जड मानले जात आहे; मात्र वाढलेल्या मतांचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उल्हासनगरमध्ये १२ टक्क्यांनी वाढ
विधानसभानिहाय मतांची टक्केवारी पाहता कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर येथे मतांचा टक्का वाढला आहे. यंदा उल्हासनगरमध्ये सर्वाधिक १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे; तर कळवा मुंब्र्यात सर्वांत कमी म्हणजेच दोन टक्के मतदान वाढले. अंबरनाथमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या तासाभरात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या वाढीव मतदारांचा कौल नेमका कोणाला जातो, हे निकालाअंती स्पष्ट होईल.

मतदारसंघ २०२४ २०१९ टक्क्यांची वाढ
अंबरनाथ ४७.०७ ४४.०१ ३.०६
उल्हासनगर ५१.१० ३९.० १२.०१
कल्याण पूर्व ५२.१९ ४३.०२ ९.१७
डोंबिवली ५१.६७ ४२.०५ ९.६२
कल्याण ग्रामीण ५१.०१ ४२.५० ८.५१
कळवा मुंब्रा ४८.७२ ४६.५० २.२२

२०२४ मतदानाची टक्केवारी
पुरुष - ५२.१९ टक्के
महिला - ४७.७५ टक्के
इतर - २१.६३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com