

बहुतांश मुंबईने केले उन्हातान्हात मतदान!
मृणालिनी नानिवडेकर
प्रत्येक गोष्टीचा मुंबई महानगरात उत्सव साजरा होतो. लोकलमध्ये दिवाळी, संक्रांत, ईद साजरी करणाऱ्या मुंबईत मतदानाचा सोहळा व्हावा, यासाठी राजकीय पक्षांइतकीच मेहनत प्रशासनानेही घेतली. मतदान केंद्रांनुसार घराघरात नावे पाठवली गेली होती. तरीही मतदान कमी झाले; पण थोडेसेच. नियोजनाअभावी बहुतांश मुंबईकरांना उन्हातान्हात मतदान करावे लागले.
मुंबईतील भूमिपुत्रांचा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय वातावरणावर प्रभाव पडला का माहीत नाही; पण मतदान काहीसे कमी झाले. सर्वाधिक मतदान झाले ते उत्तर मुंबईत, केंद्रीय मंत्री पियूष गोयल लढत असलेल्या लोकसभा मतदारसंघात. तिथे ५५.२१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ साली या भागात ६० टक्के मतदान झाले होते.
११९१ मध्ये बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत नीचांकी मतदान झाले. मतदानाला बाहेर पडायला जाऊ नये, इतके सामाजिक, राजकीय वातावरण गढूळ झाले होते.
या वेळी शिवसेनेत उभी फूट पडल्याने अस्वस्थ झालेला मुंबईकर मतदानाला बाहेर पडणार नाही, असे वाटत होते; पण गेल्या ३० वर्षांतले सर्वाधिक मतदानाच्या निष्कर्षावर दुसरे येणारे मतदान मुंबईकरांनी केले. बरेच मुंबईकर मतदानाच्या दिवसात बाहेर जाण्याचा मार्ग पत्करतात, खासगी ट्रॅव्हल्सचे आरक्षण फुल्ल होते; पण तरीही मुंबई मतदान करणार आहे, तेही विक्रमी संख्येने असे सांगितले जात होते. अन् झालेही तसेच. परस्परांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या भाजप-शिवसेनेमुळे मतदानाचा टक्का वाढणार, असा विश्वास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
बाहेरगावी गेलेल्या मतदारांना परत येण्याचे निरोप पाठवण्यापासून तर गाडी घोडे पाठवून वृद्ध कसे मतदारसंघांपर्यंत पोहोचतील, याची रचना आखण्यात सगळे राजकीय पक्ष दोन दिवस गुंतले होते. स्पर्धा असली की प्रयत्न वाढतात अन् या वेळी मुंबई कुणाची? शिवसेनेची की भाजपची, याचा निर्णय लागणार असल्याने प्रचंड चढाओढ होती.
महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीपेक्षा ०.४ टक्क्यांनी जास्त मतदान झाले आहे. २०१९ साली ६२.५ टक्क्यांची सरासरी महाराष्ट्राने गाठली होती, या वेळी पहिल्या चार टप्प्यांची एकत्रित आकडेवारी ६२.९ टक्के आहे.
गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात ५५.६ टक्के मतदान झाले होते, या वेळी २०२४ साली ते काहीसे कमी ५४.३ टक्के आहे. हे आकडे काहीसे वर जाऊ शकतात. मुंबईतल्या सहा मतदारसंघात २०१९ मध्ये ५५.४ टक्के मतदान झाले होते, या वेळी पाच वर्षांनी ते तीन टक्क्यांनी खाली घसरले खरे; पण तरीही २०१४ पेक्षा जास्तच झाले असावे, असा अंदाज आहे.
गडचिरोलीत ७१.९ टक्के मतदान झाले, नंदुरबारमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्या खालोखाल बीडमध्ये मतदान झाले. २०१४ साली मोदीलाटेचा प्रारंभ झाला, तेव्हा मुंबईतले मतदान वाढले. महाराष्ट्रातही तसेच घडले होते. दक्षिण मुंबईचा अपवादवगळता अन्य चारही मतदारसंघांत २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मतदान वाढले होते. आता २४ मध्ये ते आणखी वाढेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते; पण मतदान तीन टक्क्यांनी घसरले.
दक्षिण मुंबई हे बड्या लोकांचे मतदारसंघ. तिथे २००९ साली ४०.३६ असे नीचांकी मतदान झाले होते. २००४ मध्ये ४४.२२ टक्के, २००९ साली मतदान कमी झाले; पण २०१४ साली मतदान १२ टक्क्यांनी वाढून ५२.४८ टक्क्यांवर गेले. २०१९ साली काहीसे कमी मतदान होऊन ५१.५९ टक्क्यांवर आले. या वेळी ते ४७.७ झाले असावे, असा अंदाज आहे. मुंबईतले नीचांकी मतदान हेच. अर्धीही लोकसंख्या मतदानाला आली नाही. अर्ध्यापेक्षा काहीसे कमी मतदान झाले.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २००९ साली ४४.०५ टक्के मतदान झाले होते. २०१४ साली वाढून ते ५०.४४ टक्क्यांवर पोहोचले. २०१९ साली त्यात वाढ होत ते ५४.३७ टक्क्यांवर पोहोचले. या वेळी ते एका टक्क्याने कमी झाले आहे. अंतिम आकडे आल्यावर ते कदाचित बरोबरीत सुटेल. मुंबई दक्षिण मध्यम लोकसभा मतदारसंघात २००९ साली नीचांकी ३९.५० टक्के मतदान झाले होते. ते २०१४ साली तब्बल १५ टक्क्यांनी वाढून ५३.०९ वर पोहोचले. २०१९ साली पावणेदोन टक्क्यांनी वाढून ५५.४ टक्क्यांवर पोहोचले. या वेळी मात्र ते घसरून ५१.९ वर थांबले आहे.
२००९ साली उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईत ४२ टक्के मतदान झाले होते. उत्तर मुंबईत २०१४ साली ते वाढून ५४.८६ टक्के झाले. तर २०१९ साली ते चक्क पाच टक्क्यांनी वाढून ६०.०९ वर स्थिरावले. या वेळीही उत्तर मुंबईत सर्वाधिक मतदार बाहेर पडले. उत्तर पूर्वेत ते २०१४ साली ९.१९ टक्क्यांनी वाढून ५१.६५ टक्के झाले आणि २०१९ साली ५७.२३ टक्के म्हणजे इथेही ५.५८ टक्क्यांची वाढ झाली; पण या वेळी उत्तर पूर्वने तीन टक्के मतदान घसरल्याची नोंद केली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात २००९ साली ३९.५२ टक्के नीचांकी मतदान झाले होते. ते २०१४ साली आठ टक्क्यांनी वाढून ४८.६६ वर
पोहोचले. तर २०१९ साली ते पाच टक्क्यांनी वाढून ५३.६८ टक्के झाले. तेही या वेळी तीन टक्क्यांनी घसरून ५१.४ वर स्थिरावले आहे. २००९ नंतरची ही वाढ २०२४ सालीही कायम राहते का, ते पाहावे लागेल.
मुंबईलगत हाच अनुभव
पालघर हा मुंबईलगतचा मतदारसंघ. गेल्या वेळी इथे ६३.७ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ६१.६ टक्के मतदानाची नोंद झाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ कल्याणमध्ये गेल्या वेळी ४५.३ टक्के मतदान झाले. यावेळी हा मतदारसंघ महत्त्वाच्या खासदाराचा झाल्याने ती दोन टक्क्यांनी वाढून ४७.१ टक्क्यांवर गेली. अर्ध्याहून अधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाच नाही. ठाणे आता मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. तिथे ४९.४ वरून मतदान ४९.८ टक्के झाले.
भिवंडीचा अपवाद
भिवंडीत केंद्रीय मंत्री भाजपनेते कपिल पाटील मैदानात होते. बाळ्या मामा म्हात्रेंनी त्यांना आव्हान दिले होते. नीलेश सांबरेंमुळे लढत तिरंगी झाली होती. तिथे मतदानात तीन टक्क्यांची वाढ झाली. ५३.२ वरून ५६.४ टक्क्यांवर मतदान गेले. स्पर्धेमुळे उमेदवारांनी आपापले समर्थक बाहेर काढले असावेत, असा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.