

मतदान संपले, सुरू झाली प्रतीक्षा
उमेदवारांनी कसा घालवला दिवस?
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २१ : मतदान आटोपले, प्रचार दोन दिवस आधीच संपला होता. गेला महिनाभर उन्हातान्हात फिरणाऱ्या, नागरिकांना आश्वासने देत फिरणाऱ्या अन् खर्च आटोक्यात आहे की नाही, याकडे लक्ष देणाऱ्या उमेदवारांनी मंगळवारचा (ता. २१) दिवस नेमका घालवला तरी कसा, याचा ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.
दक्षिण मुंबईची खासदारकी दोनदा सांभाळलेले अरविंद सावंत शिवसेनेचा भाजपशी वाद होण्यापूर्वी केंद्रात मंत्रीही होते. आज केलेत तरी काय, असे विचारले असता ते म्हणाले, आज ठिकठिकाणचे पोलिंग एजंट येऊन काय काय घडले ते सांगत होते. केंद्रावर उमेदवाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही सोमवारी (ता. २०) रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवले होते. त्या भगिनी येऊन मतदानप्रक्रिया संथगतीने का झाली, ते सांगत होत्या. दररोजची कामे सुरू होती. नागरिकांच्या तक्रारी सुरू होत्या. मी कार्यालयात कायमच असतो. नेहमीची गर्दीही होतीच. निवडणूक असो किंवा नसो माझे काम सुरूच असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिलेल्या समाजकारणाच्या वसानुसार काम करतोय.
प्रसिद्ध विधीज्ञ उज्ज्वल निकम या निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच राजकारणात उतरले आहेत. गर्दी, झेंडे, कार्यकर्ते, बुथची रचना सगळाच प्रकार त्यांना नवा. सतत संपर्क, धावपळ यामुळे प्रचाराची लज्जत अनुभवली. छान वाटत होते, असे सांगत ते म्हणाले, आजचा संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालवला. त्यांच्या पत्नी ज्योती स्वत:चे अनुभव सांगताना म्हणाल्या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने उदंड प्रेम दिले. प्रचारानिमित्त नव्या ओळखी झाल्या. पहिल्यावहिल्या निवडणूक लढण्याच्या अनुभवानंतर निकालाबद्दल नेमके काय वाटतेय, असे विचारताच ॲड. निकम म्हणाले, मी खटला लढवताना मनापासून तयारी करत बाजू मांडतो, योग्य तो युक्तिवाद केल्यानंतर निकाल न्यायदेवतेवर सोडून देतो. याही वेळा सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे योग्य ती सगळी मेहनत केली, आता निकाल जनताजनार्दनाच्या हाती.
वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावत मतदान कसे झाले, याची सविस्तर माहिती पक्षश्रेष्ठींना दिली. उत्तर मुंबईत या वेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे उमेदवार होते. मुलुंड परिसरात मतदान संपताच त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत वडापाव खाल्ला आणि केंद्रीय कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उत्तर मुंबईतून निवडणूक लढवलेले गोयल दक्षिण मुंबईतल्या नेपियनसी रोडचे रहिवासी. उत्तरेतून निवडणूक लढवा, असे पक्षाने सांगितल्यावर त्यांनी या भागात घर भाड्याने घेतले. तिथल्या रहिवाशांशीही त्यांनी संपर्क साधला.
..
शेलार सफाई मोहिमेच्या पाहणीला
भाजपसाठी मुंबईची लढाई फार महत्त्वाची आहे. या लोकसभा मतदारसंघातल्या सहाही जागांकडे लक्ष ठेवणे ही भाजपचे शहरप्रमुख आशीष शेलार यांची जबाबदारी. उमेदवारीस नकार देणाऱ्या शेलारांनी पुढच्या निवडणुकांची व्यूहरचना सुरू केली आहे. आज ते मुंबईत नालेसफाईचे काम कसे सुरू आहे ते पाहायला गेले. कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड स्वत: उमेदवार, आज त्याही धारावी परिसरातल्या कार्यालयात हजर होत्या, असे समजते. कीर्तिकर पिता-पुत्रांचे पक्ष वेगळे. आज शिंदेगटात असलेले मावळते खासदार गजानन किर्तिकर मुलगा अमोल त्याच्या विचारांशी एकनिष्ठ राहिल्याचे कौतुक करत होते. ठाकरे गटासमवेत असलेले अमोल कीर्तिकर कार्यकर्त्यांशी भेटून आढावा घेत ते उभे असलेल्या मतदारसंघात कसे मतदान झाले ते समजून घेत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.