आचारसंहितेमुळे मोफत बियाणे वाटपाला ब्रेक

आचारसंहितेमुळे मोफत बियाणे वाटपाला ब्रेक

मोफत बियाणे वाटपाला ब्रेक
१० हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ; आचारसंहिता शिथील करण्याची कृषी विभागाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : नाचणी, वरई, तूर या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे कृषी विभागाला बियाणांचे वाटप करता येत नाहीत. पेरण्या होण्यापूर्वी बियाणे वाटप होणे आवश्‍यक असल्‍याने शेतकऱ्यांकरिता आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी जिल्हा कृषी विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काही दिवसांतच रायगड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरण्या सुरू होतील. येथील मातीत रुजणाऱ्या परंतु शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नसलेल्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत १० हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे. नाचणी, वरई, तूर आणि ज्यांच्याकडे भाताची बियाणे शिल्लक नाही, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे मोफत दिले जाते.
पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्‍याने विविध कंपन्यांची नियमित बियाणे वितरकांकडे पोच झाली आहेत. शेतकरी बियाणे विकत घेत पेरणीच्या तयारीला लागले आहेत, मात्र १०० टक्के मोफत अनुदानित बियाणे मिळण्यास विलंब होत आहे. या समस्येवर मार्ग काढावा, यासाठी कृषी विभागाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मोफत बियाणे वाटपाचा लाभ रायगड जिल्ह्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांना मिळणार असला तरी ते केव्हा उपलब्‍ध होणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

फार्महाऊसमध्ये नाचणी लागवड
तृणधान्य वर्ष म्हणून गतवर्षी नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. याचाच एक भाग म्हणून यंदा रायगड जिल्ह्यातील फार्महाऊसमध्ये नाचणीची लागवड करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केल्या आहेत. जिल्ह्यात फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. आजूबाजूला मोकळी जागा असल्याने या मोकळ्या जागेत नाचणीची लागवडीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. फुल झाडे किंवा शोभेची झाडे लावण्यापेक्षा मोकळ्या जागेत नाचणीचे बियाणे पेरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


नाचणी- रायगड जिल्ह्यात पूर्वी नाचणी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असे. या पिकाला पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी यंदा २ हजार हेक्टर क्षेत्रातील लागवडीसाठी १०० क्विंटल इतके बियाणे मोफत दिले जाणार आहे. दापोली-१, दापोली-२, दापोली-३ असे बियाणे महाबीज या उत्पादक संस्थेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत २० क्विंटल बियाणे ४०० हेक्टर क्षेत्रातील लागवडीसाठी मोफत दिले जाणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

भात बियाणे ः राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत ज्यांच्याकडे भात बियाणे शिल्लक नाही किंवा नव्याने लागवड करणारे शेतकऱ्यांसाठी ११३ क्विंटल कर्जत-९ हे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ५० क्विंटल रत्नागिरी ६, ८, कर्जत - ९ हे बियाणे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ अडीच हजार शेतकऱ्यांना होणार असून वाटपाबाबत नियोजन सुरू आहे.

वरई ः एकेकाळी नाचणीबरोबर वरई पिकांचेही उत्पादन घेतले जात होते, मध्यंतरी वरईचे लागवडीखालील क्षेत्र घटले. नव्याने प्रोत्साहन देताना फुले एकादशी या वाणाचे दीड क्विंटल बियाणांचे वाटप केले जाणार आहे. यातून ३० हेक्टर क्षेत्रावर वरईचे पीक घेतले जाणार आहे.

तूर ः शेताच्या बांधावर तुरीची लागवड चांगल्या प्रकारे होते. या पिकाच्या वाढीसाठी सहा क्विंटल बियाणे दीड हजार शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.


१०० टक्के मोफत बियाणे वाटपाची सर्व तयारी झाली आहे. मात्र, आचारसंहितेमुळे वाटप करता येत नाही. यासाठी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत शिथिलतेचे आदेश आल्यावर वाटप सुरू केले जाईल.
- सतीश बोराडे, प्रभारी कृषी उपसंचालक, रायगड

..............

खरिपासाठी २० हजार मेट्रीक टन खतांची मागणी
पाली, ता. २९ (वार्ताहर) ः जिल्ह्यात १ लाख १ हजार ५१० हेक्टरवर यंदा खरिपाची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून त्‍यासाठी २० हजार मेट्रीक टन खतांची मागणी सरकारकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. यात प्रामुख्याने ९८ हजार ४८७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर ३ हजार ०२३ हेक्टरवर नाचणी लागवडीचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी ९० हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती.
यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात जवळपास २२ हजार क्विंटल सुधारित तर २५० क्विंटल संकरित भात बियाणांचा समावेश आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी मशागत कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरू झाली आहेत. याशिवाय बांधबंदिस्ती, चर मारणे यासारखी कामेही जोमाने सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com