बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

वाशी, ता. १ (वार्ताहर) : पावसाळापूर्व रस्ते खोदकामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि बेशिस्त रिक्षा तसेच इतर वाहनचालकांमुळे सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. महापालिकेच्या कंत्राटदाराकडून रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सानपाडा रेल्वे स्थानक परिसर हा नवी मुंबईतील गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वाशी एपीएमसीतील पाचही मार्केटमधील बहुतांश कामगार, त्याचसोबत वाशी, तुर्भे, सानपाड्यातील लहान-मोठ्या कंपन्यांमधील नोकरदार सानपाडा रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकात रिक्षा आणि इतर वाहनांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. सध्या महापालिकेतर्फे सानपाडा रेल्वे स्थानक सेक्टर ३० ए या भागात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने सानपाडा बस स्थानकापासून रेल्वे स्थानकाकडे येणारा रस्ता बंद आहे. तसेच सानपाडा रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडणाऱ्या मुख्य द्वाराकडेच रस्ता अरुंद झाल्याने केवळ एकल वाहतुकीसाठीच रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे. त्यातही रस्त्यालाच लागून रिक्षा स्टँड असल्याने रिक्षांची मोठ्या प्रमाणात वर्दळ येथे पाहायला मिळते.

---------
फलक लावूनही दुर्लक्ष
‘एकल वाहतुकीसाठी रस्ता’ असा फलक लावूनदेखील बेशिस्त वाहनचालक दोन्ही दिशेने वाहने चालवत आहेत. परिणामी दररोज सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता रहदारीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकी कोंडी पाहायला मिळते आहे. यामुळे कंत्राटदाराचे संथगतीने सुरू असलेले काम तसेच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दररोज कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

-----------
रस्ताकामाची मुदत संपूनही कामे सुरूच
महापालिकेने रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देऊनही अद्याप सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. शहर अभियंता संजय देसाई यांनी ३१ मेपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले होते; परंतु आता ३१ मेपर्यंत काम घाईने पूर्ण जरी झाले, तरी कामाचा दर्जा कसा असेल, याबाबत नागरिक संशय व्यक्त करत आहेत.

-----------
वाहतूक कोंडी होऊ नये, याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. रस्त्याचा एक भाग बंद असल्याने सानपाडा बस स्थानकाला लागून असलेल्या दुसऱ्या रस्त्यावरून वाहतूक वळवली आहे. तसेच दररोज संध्याकाळी बीट मार्शलच्या साह्याने वाहनांवर नजर ठेवण्याचे काम सुरू आहे. गरज पडल्यास सकाळच्या वेळीदेखील बीट मार्शलची गस्त सुरू ठेवणार आहे.
- श्रीकांत धरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे वाहतूक शाखा

-----------
मागील १० ते १५ दिवसांपासून सानपाडा रेल्वेस्थानकाजवळील रस्त्याचे काम सुरू आहे. खोदकामामुळे व कोंडीमुळे रिक्षाचालक भाड्यासाठी लवकर तयार होत नाहीत. रिक्षासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे दररोज कामावर जाण्यास उशीर होत आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण होऊन प्रवाशांचे हाल थांबवावेत.
- प्रसाद धनावडे, रेल्वे प्रवासी, सानपाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com