मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी एकूण १२,५०,०७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाच्या मोजणीला भिवंडी तालुक्यातील सावद गावातील आमणे येथील सापे-पडघा रोडवरील के. यू. डी. कम्पा‍ऊंड येथे ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर अंजूर फाटा येथील ओसवाल समाज हॉलमध्ये झाले. दुसरे प्रशिक्षण शिबिर ३ जूनला दुपारी ११ वाजता मतमोजणीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १२,५०,०७६ मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या मदतीसाठी असे एकूण ५५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची (पोलिस कर्मचारीवगळून) नियुक्ती करण्यात आली आहे. अंदाजे ५५० च्या आसपास पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही पुरेसा बंद पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. प्रसारमाध्यम कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.

१०६ टेबलांवर मतमोजणी होणार
मतमोजणी केंद्रात सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात प्रत्येकी १४ प्रमाणे ७० टेबल लावण्यात आले आहेत. तर मुरबाड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत २१ टेबल लावण्यात येणार आहेत. टपाली मतदानाच्या मतपत्रिका मोजणीसाठी एकूण १४ टेबल, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि गृहमतदानांची मतमोजणीसाठी एक टेबल, असे एकूण १०६ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघात एकूण मतमोजणी प्रत्यक्ष होणार आहे. मतमोजणी ही संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे.

४३८९ टपाली मतदान
टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. यामध्ये गृहमतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण ४२६३ मतदान आहे. तर सर्विस वोटरची संख्या आजपर्यंत ११६ आहे. असे एकूण ४३८९ टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.

एकूण २९ फेऱ्या
१३४ भिवंडी ग्रामीण २५ फेऱ्या, १३५ शहापूरसाठी २४ फेऱ्या, १३६ भिवंडी पश्चिमसाठी २२ फेऱ्या, १३७ भिवंडी पूर्व २३, १३८ कल्याण पश्चिमसाठी २९ आणि १३९ मुरबाडकरता २५ फेऱ्या होणार आहेत. जास्तीत जास्त मतदानाच्या एकूण २९ फेऱ्या होणार आहेत. किमान चार वाजेपर्यंत मतमोजणी चालेल आणि नंतर निकाल जाहीर होईल, असा अंदाज यंत्रणेने व्यक्त केला आहे.

निरीक्षकांची नियुक्ती
प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक निरीक्षक, सहायक आणि शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षकांच्या नेमणुका केलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती मतमोजणीसाठी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com