शैक्षणिक साहित्यांनी सजला बाजार

शैक्षणिक साहित्यांनी सजला बाजार

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : शैक्षणिक सत्रातील शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वी शैक्षणिक साहित्य खरेदीकडे पालकांचा कल हळुहळू वाढला आहे.
राज्यातील शाळा १० जून रोजी उघडणार असल्याने नवी मुंबईतील बाजारपेठा आणि शैक्षणिक साहित्याच्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल, कंपास बॉक्स, आकर्षक पेन, पाण्याच्या बाटल्या, स्कूल बॅग आदींनी दुकाने सजली आहेत. असे असले तरी शैक्षणिक साहित्याचे दर वाढले असल्याने पालकांच्या खिशाला यंदा कात्री लागली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश, नवे बूट, दफ्तर, वह्या-पुस्तके, कंपासपेटी या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची विविध मार्केटसह डीमार्ट व स्टेशनरीच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. राज्यातील शाळा १० जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे यंदाही बाजारपेठेत विविध प्रकारच्या लहानग्यांना आकर्षित करणाऱ्या वह्या उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, निसर्ग यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगांच्या, कार्टुनची चित्रे असणाऱ्या व विविध आकाराच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत. यावर कार्टुन्सची चित्रे, बार्बी डॉल, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेल्या बॅग तसेच टिफीन बॉक्सही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत; मात्र याच्या किमती जास्त असल्याने अनेक दुकानांत पालक मुलांच्या हट्टाला आवर घालताना दिसून आले. खोडरबर, पेन्सिल, पेन, रंगपेटी असा एकत्रित संचदेखील बाजारात उपलब्ध असल्याने पालकांचा एकत्रित संच घेण्याकडे वाढता कल असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

------
मागणीनुसार उपलब्ध
आपल्या मूळ गावी गेलेले सर्व जण १० मेपर्यंत नवी मुंबईत येणार असल्याने त्यानंतर बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांच्या व पालकांच्या मागणीनुसार बाजारात साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

-----------
आकर्षक सूटचे आकर्षण
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते मोठ्या ऑफर देत असल्याने शहरातील डीमार्ट, मॉलमध्ये वर्दळ वाढू लागली आहे. डीमार्ट व मॉलमध्ये शैक्षणिक वस्तूंवर आकर्षक २० ते ३० टक्के सूट, बॅग आणि टिफिन, बॉटल्स खरेदीवर २० ते ४० टक्के सूट दिली आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी असल्याने येथे जाऊन खरेदी करण्याला पालकांनी प्राधान्य दिले. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वह्यांच्या किमती वाढल्या आहेत. तसेच इतर पट्टी, पेन्सिल, कंपास हेदेखील महाग झाले आहेत.

----------
दरवर्षी शैक्षणिक साहित्यामध्ये १० ते २० टक्के वाढ होतच असते. सध्या बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. पुढच्या आठवड्यात खरेदीसाठी गर्दी वाढणार आहे. त्यामुळे आम्ही लवकरच शालेय साहित्य खरेदीला प्राधान्य देत आहे. सध्या गर्दी कमी असल्याने व्यवस्थित खरेदी करता येते.
- श्‍वेत मढवी, पालक

--------
पुढच्या आठवड्यापासून खरेदीसाठी गर्दी अधिक वाढणार आहे. याही वर्षी शैक्षणिक साहित्यात वाढ झाली आहे. कार्टुनचे चित्र असणाऱ्या वस्तूंना बच्चे कंपनीकडून मागणी वाढली आहे.
- मनोज छेडा, दुकानदार

--------
वह्यांचे दर दर (एक डझनचा दर)
फुलस्केप वही - ५०० ते ६००
लहान वही - २५० ते ४६०

----------
इतर साहित्याचे दर दर (एक नग)
चित्रकला वही - २० ते ७०
रंग - १० ते १००
कम्पास - १५० ते ४५०
टिफिन - ९९ ते ७००
पाणी बॉटल - ५० ते ५५०
पेन्सिल बॉक्स - ४० ते ८०
पेन बॉक्स - १० ते २५०

-----------------
स्कूल बॅग वयोगटानुसार दर
५ ते १५ वर्षे - ३०० ते १०००
१५ ते १८ वर्षे - ५०० ते १२००
१८ वर्षांपुढे - ५०० ते १२००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com