अंबरनाथमध्ये कचऱ्याचा ढीग

अंबरनाथमध्ये कचऱ्याचा ढीग

अंबरनाथमध्ये कचऱ्याचा ढीग
समाजमाध्यमातून टीकेची झोड
अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची भावना पसरली आहे. उच्चभ्रू सोसायट्यांतील नागरिकांनी समाजमाध्यमाद्वारे पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली; तर काही माजी नगरसेवकांनीही नगरपालिका प्रशासनाला कचरा प्रकरणावरून कोंडीत पकडले आहे. शहरातील कचरा उचलण्याचे काम ठेकेदारी पद्धतीवर सुरू आहे; मात्र ठेकेदाराला त्याच्या कामाचे पैसे न मिळाल्याने कचरा उचलण्याचे काम थांबवले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसाळा जवळ आल्याने कचरा उचलला नाही, तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकेल, प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केली आहे.

मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर कुंड्यांबाहेरच कचरा टाकला जात आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही घंटागाड्या नियमित येत नाहीत. त्यामुळे कचरा उचलला जात नाही. याबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याचे कारण सांगून माजी नगरसेवक साळुंके यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. वेळीच उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साळुंके यांनी प्रशासनाला दिला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून कचरा गाड्या न आल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचरा, शहरातील अनधिकृत होर्डिंग, तसेच इतर समस्यांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे; अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला आहे.

चार वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राजवटीने सर्वच सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. संपूर्ण शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते, याचा प्रशासनाने विचार करावा. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न माजी लोकप्रतिनिधींमार्फत सुरू आहे, सहकार्य करावे, असे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी म्हटले.

समाजमाध्यमांवर चर्चा
इतर नगरपालिकामध्ये प्रशासकीय राजवट असताना तेथील कचरा समस्या भेडसावत नाही का, असा सवालही समाज माध्यमांवर विचारला गेला. मालमत्ता करामध्ये घनकचरा शुल्क आकारणी वसूल केली जाते. मग कचऱ्याची समस्या कशी निर्माण होते, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान कचरा समस्येविषयी अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजित पराडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com