शालेय साहित्य खरेदीला वेग

शालेय साहित्य खरेदीला वेग

ठाणे, ता. १ (बातमीदार) : उन्हाळ्याची सुट्टी संपायला आणि शाळा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १० जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्यामुळे पालकांसह चिमुकल्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पुस्तके, वह्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल, कंपास बॉक्स आणि स्टेशनरी अशा वस्तू खरेदी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बाजारात गर्दी होत आहे. काही दिवसांनी शाळा सुरू होत असल्याने विक्रीला तेजी येणार आहे, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी नवीन दप्तर, गणवेश, सॅण्डल-बूट, वह्या-पुस्तके, त्यांचे कव्हर, कंपास पेटी, पेन यांसह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची बाजारात गर्दी वाढू लागली आहे. अभ्यासात कोणत्याही बाबतीत मुलांना काही कमी पडू नये, यासाठी पालकही काटकसर करून विद्यार्थ्यांची हौस पूर्ण करत आहेत. शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थ्यांनाही नवा वर्ग, मित्रांच्या भेटीची उत्सुकता लागलेली आहे. दुसरीकडे पालकांना केवळ शाळेचे साहित्य नव्हे, तर शाळेत सोडण्यासाठी असणारी वाहने, शाळेचे शुल्क आणि अन्य खर्च करावा लागणार आहे. यंदा बाजारपेठेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, निसर्ग यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगांच्या, कार्टुनची चित्रे असणाऱ्या व विविध आकाराच्या स्कूल बॅग बाजारात आल्या आहेत.

कार्टून कंपास बॉक्स बाजारात
मुलांची दप्तरातील कंपास बॉक्स ही सर्वांत महत्त्वाची आणि आवडती वस्तू असते. यासाठी गेम्स, कार्टून अशा आवडत्या आकारातील कंपास बॉक्स बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. हे बॉक्स साधारण १०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत.

एअर टाइट लंच बॉक्सला पसंती
कार्टून्सची चित्रे असलेल्या वॉटरबॅग, टिफीन बॉक्स जरी मुलांना आवडत असले, तरी हल्ली एअर टाइट लंच बॉक्सला पालकांकडून पसंती मिळते. आपल्या पाल्याला गरमा-गरम अन्न मिळावे; तसेच बॉक्समधून अन्न सांडू नये, यासाठी एअर टाइट टिफीन बॉक्सला मागणी वाढत आहेत. या टिफिनच्या किमतीही वेगवेगळ्या प्रतीनुसार १०० रुपयांपासून पुढे आहेत.

शालेय पुस्तकांची विक्री कमी
मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके देण्यात येतात. या पुस्तकांच्या संचामध्ये एखादे पुस्तक कमी असेल किंवा आलेले नसेल, तरच पालक संबंधित पुस्तक दुकानांमधून विकत घेतात. पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके कमी किमतीत घेतली जात आहेत. त्यामुळे शालेय पुस्तकांची विक्री कमी होत आहे, असे विक्रेत्यानी सांगितले.


रद्दी विकून नव्या पुस्तकांची खरेदी
गेल्या वर्षी वापरलेल्या वह्या किंवा शाळेतून मिळणारे पुस्तके अशी रद्दी विकून त्यातून काही प्रमाणात पैसे मिळतात. त्यामध्ये थोड्या अधिक पैशांची भर करून सर्वसामान्य नागरिक त्यांची नवीन पुस्तके खरेदी करत आहेत. ही रद्दी १२ ते १४ रुपये किलोने विकली जात आहेत.

वस्तूंच्या किमती (रुपयांत)
लहान मुलांचा गणवेश - ५००
मोठ्या मुलांचा गणवेश - ५०० ते ८००
वह्या (डझन) - ६०० ते ७००
पेन - ४ ते ८०
कंपास पेटी - १०० ते ५००
सैंडल - ४००

विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असलेले सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य दुकानात उपलब्ध आहे. एक महिन्यापासूनच खरेदी करण्यासाठी पालक येत आहे.
- प्रदीप परयाणी, दुकानदार

मुलांची शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. काही वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत; मात्र शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य हे गरजेचे आहे. त्यामुळे सुट्टीचा दिवस बघूनच खरेदी करावी लागत आहे.
- उमेश मोरे, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com