मिशन ६३ तास अंशतः पुर्ण

मिशन ६३ तास अंशतः पुर्ण

मिशन ६३ तास अंशतः पूर्ण

५०० कर्मचाऱ्यांकडून सलग राबून फलाट रुंदीकरणाचे काम


ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वेस्थानकात ६३ तास मेगाब्लॉक घेत फलाट क्रमांक ५ व ६ च्या रुंदीकरणाचे काम अखेर अंशतः पूर्ण करण्यात आले. काही किरकोळ कामे वगळता रुंदीकरणाची महत्त्वाची मोठी कामे शनिवारी (ता. १) दुपारीच पूर्ण करण्यात आली.

६३ तासांच्या जम्बो ब्लॉकमध्ये ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी फलाट रुंदीकरणाचे काम अविरतपणे पूर्ण केले. अशा प्रकारचे काम करणारे ठाणे रेल्वेस्थानक देशात पहिले ठरले. आजवर देशभरात असा ब्लॉक घेऊन स्थानकाची लांबी वाढवण्याचे काम झाले; परंतु त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रथमच करण्यात आले झाले. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांकडून अभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. ठाणे स्थानकावरील प्रवासी वाहतुकीचा भार वाढला आहे. त्यातच ५ ते ६ फलाट अरुंद असल्याने या फलाटावर चेंगराचेंगरीचे प्रकार पुढे येत होते. त्यातच या ठिकाणी पीक अवर्समध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे अभियंत्यांनी फलाट क्रमांक ५ चा रेल्वे रूळ सरकवून हा फलाट रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामाची पूर्वतयारी करून गुरुवारी मध्य रात्रीनंतर (ता. ३०) ते रविवार (ता. २) पर्यंत ६३ तासांचा जेम्बो ब्लॉक घेऊन या कामाला सुरुवात करण्यात केली. यासाठी ४००-५०० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये सिमेंट काँक्रिटचे ब्लॉक वापरून काही तासांतच फलाटाची रुंदी १० फुटांपर्यंत वाढवण्यात आली. हे काम करताना अत्याधुनिक पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारचे काम पहिल्यांदाच होणारे ठाणे हे पहिले रेल्वेस्थानक ठरले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी शनिवारी (ता. १) रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक एस. के. यादव, डीआरएम शैलेब गोयल यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणे स्थानकात भेट दिली.


..
अविरतपणे काम पूर्ण
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील होती. गाड्यांचे योग्य नियोजन केले जात होते. काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. हे काम करण्यासाठी मजूर निवडून घेण्यात आले होते. रुंदीकरणासाठी लागणारे सिमेंटचे मोठे ब्लॉक, सिमेंट, वाळू, खडी आदी साहित्य आणण्यासाठी रेल्वेकडून मालगाडीचा वापर करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी वेळ विभागून देण्यात आली होती. त्यामुळे खंड न पडता काम सुरूच ठेवता आले. शनिवारी दुपारपर्यंत फलाट रुंद करण्याचे काम पूर्ण झाले होते. रुंद केलेल्या भागात वाळू, सिमेंट टाकण्याचे काम रात्री केले जाणार होते. दिवसा स्थानकावरील प्रवाशांच्या अंगावर सिमेंट, वाळूची धूळ उडू नये, यासाठी फलाट रुंदीचे काम झालेले असतानाही कर्मचाऱ्यांना पुढील कामासाठी रात्र होण्याची प्रतीक्षा करावी लागली.


रुंद करण्यात आलेल्या भागाचे रात्रीच काँक्रीटीकरण केले जाणार असल्याने हा फलाट रविवारी (ता. २) सकाळी प्रवाशांच्या वापरासाठी खुला करता येईल; परंतु इतर किरकोळ कामे देखील पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या वेळेत हे काम करून घेण्यात येत आहे. रविवारी दुपारी ४ वाजता हा फ्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी पूर्णतः सज्ज होईल. या काळात प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल असा प्रयत्न केला आहे.
- केशव तावडे, स्थानक व्यवस्थापक, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com