कंपनी मालकाला सव्वा कोटींचा चुना

कंपनी मालकाला सव्वा कोटींचा चुना

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : फर्निचरच्या कारखान्यातील व्यवस्थापकाने व महिला अकाऊंटटने कारखान्यात तयार झालेल्या फर्निचरचा माल परस्पर विकून कंपनी मालकाला तब्बल सव्वा कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संजय साईलकर (४६) व अर्चना ऊर्फ विमल कासार (३०) अशी या दोघांची नावे आहेत. नेरूळ पोलिसांनी या दोघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
सीवूड्समध्ये राहणारे कुंदन राऊत (४६) यांचा नेरूळमध्ये फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय आहे. मे २०२२ मध्ये राऊत यांनी फर्निचर तयार करण्याचा दुसरा कारखाना कोल्हापूर येथे सुरू केला होता. त्या ठिकाणी त्यांनी संजय साईलकर याला व्यवस्थापक म्हणून; तर अर्चना कासार हिला अकाऊंटंट म्हणून कामाला ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्या दोघांनी कारखान्यात तयार झालेल्या फर्निचरची परस्पर विक्री केली. राऊत यांनी साईलकर याला तीन वर्षांमध्ये फर्निचरचा माल तयार करण्यासाठी ४५ लाख ६२ हजार रुपये दिले होते, तसेच ५१ लाख ७३ हजार रुपये किमतीचा कच्चा माल दिला होता; मात्र यातून त्यांना कुठल्याच प्रकारचा नफा मिळत नसल्याने त्यांनी कोल्हापूर येथे जाऊन हिशेबाची तपासणी केल्यानंतर साईलकर याने तयार केलेले फर्निचर त्याच्या ओळखीतील ग्राहकांना विकल्याचे उघडकीस आले. त्यानंतर राऊत यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन या दोघांविरोधात तक्रार दाखल केली.
--------
असा झाला प्रकार उघड
चोरी पकडली जाऊ नये, यासाठी साईलकर व विमल कासार यांनी संगणकामधून तीन वर्षांचा सर्व डाटा डिलीट केला होता. त्यामुळे राऊत यांनी डिलीट केलेल्या सर्व फाईल्स सायबर एक्स्पर्टच्या माध्यमातून पुन्हा मिळविल्या. त्यामध्ये साईलकर व विमल यांनी २०२२-२३ या कालावधीत १६७ ग्राहकांना मालाची विक्री केल्याचे तसेच मालाचे यूपीआयद्वारे २७ लाख ५४ हजार रुपये आपल्या खात्यात घेतल्याचे दिसून आले. अशा प्रकारे या दोघांनी राऊत यांची सुमारे सव्वा कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com