जव्हारमध्ये राब भाजणींच्या कामांना वेग

जव्हारमध्ये राब भाजणींच्या कामांना वेग

जव्हार, ता. २ (बातमीदार) : तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. चार महिने पावसाळ्यात केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आठ महिने गुजराण होते. नेहमीप्रमाणे यंदा पीक अधिक यावे, या आशेने येथील बळीराजा सज्ज झाला असून, राब भाजणीच्या कामाला वेग आला आहे.

तालुक्यासह नांदगाव, झाप, साकूर आणि पिंपळशेत खरोंडा या परिसरात भात उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या आदिवासी भागासह विविध भागात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत गुंतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणी. भात, नागलीचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते. पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिल्या जातात. यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाते. शिवाय जमीन भुसभुशीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात आणि नागलीची रोपे तयार केली जातात.

खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मेपासूनच सुरू करण्यात येते. सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मेच्या अखेरीस सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला असून अशातच पाऊस पडला, तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल. या चिंतेने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे, तर आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे.

तालुक्यातील शेतकरी कुटुंबांनी काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे आदी कामे सुरू केली आहेत. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांकडे बैलजोडीच्या साह्याने कामे उरकून घेण्यात येत आहेत. साधारण जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यात शेतकरी राब करणे, मशागत करणे, बांधबंदिस्ती, लाकूड फाटा, आगोटची पूर्वतयारी करतो.

पावसाने नुकसानीची भीती
बांधबंदिस्त, तसेच राब करणे आदी कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून जांभूळ, आंबे या फळांचे पीकही उशिराने बाजारात दाखल होत आहे. अशातच पाऊस सुरू झाला तर नुकसानीला सामोरे जावे लागणार असून आर्थिक नियोजन बिघडेल, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.

यावर्षी पाऊस लवकरच पडण्याची चिन्हे दिसत असून पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच महत्त्वाचे असणाऱ्या भातपिकासाठी जमीन तयार करणे गरजेचे आहे. आता पाऊस पडायच्या आत शेतातील फोडून ठेवलेला लाकूड फाटा, गुरांसाठी ठेवलेली वैरण काडी, पेंढा पाऊस पडण्याच्या आत घरात साठविणे, राब भाजणी, राबाच्या शेतात नांगरणी, वखरणी करणे या कामांच्या पूर्वतयारीची लगबग चालू आहे.
- मिलिंद मुकणे, चोथ्याची वाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com