मिठीत कचऱ्याचे ढीग, गाळाचा खच

मिठीत कचऱ्याचे ढीग, गाळाचा खच

बापू सुळे, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मिठी नदीतून आतापर्यंत तब्बल एक लाख ९८ हजार मेट्रिक टन म्हणजे जवळपास ९१ टक्के गाळ उपसल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे; मात्र मिठी नदीबरोबरच तिला जोडणाऱ्या नाल्यांची सद्यस्थिती पाहिली तर पालिका प्रशासनाचा दावा फोल असल्याचा आरोप परिसरातील झोपडपट्टीवासीय करीत आहेत. वांद्रे-कुर्ला संकूलाला जोडणारा पूल, सीएसटी रोड, किस्मतनगर, शांती नगर, एअरपोर्ट परिसर, सफेद पूल नाला येथे आजही गाळाचा आणि कचऱ्याचा खच आहे. आठवडाभरावर मान्सून आल्याने तो काढणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. त्याचा फटका परिसरातील झोपडपट्टीवासीयांना बसणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून शहर आणि परिसरातील नालेसफाई, मिठी नदीतील गाळ काढला जातो. त्यानुसार पासवळ्यापूर्वी ८० टक्के व पावसाळ्यानंतर २० टक्के अशी कामाची विभागणी असते. त्यानुसार पावसाळापूर्व आणि पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये दोन लाख ७० हजार २१८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून एक लाख ९८ हजार मेट्रिक टन गाळाचा उपसा आतापर्यंत काढल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मिठी नदीच्या एकूण १७.८४ किलोमीटर लांबीपैकी विहार तलाव ते फिल्टरपाडा (पवई)दरम्यानचा ०.८४ किमी लांबीचा भाग हा नैसर्गिक दरी असलेला आहे. फिल्टरपाडा (पवई) ते सीएसएमटी पूल कुर्लादरम्यानचा ११ किमी लांबीचा मार्ग मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असून येथे पालिकेकडून गाळ काढला जातो. या टप्प्यातील ठिकठिकाणी पालिकेने गाळ काढला असून अनेक ठिकाणी गाळ उपसण्याचे काम सुरू आहे; मात्र काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे मोठे आव्हान आहे.
--------
परिस्थिती जैसे थे
पालिकेने मिठी नदीबरोबरच तिला मिळणाऱ्या एअरपोर्ट नाला, सफेद पूल येथील गाळ आणि कचरा काढला आहे. तरीही अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि गाळाचे ढीग आहेत. पावसाच्या पाण्यामुळे ते वाहून न गेल्यास पाणी तुंबून सखल भागात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सफेद पूल नाला तुंबण्याची भीती
विहार लेकहून येणाऱ्या मिठी नदीला एअरपोर्ट-जरीमरी येथे सफेद पूल नाला येऊन मिळतो. सध्या येथील पाण्याचा प्रवाह सुरळीत असला तरी विहार आणि पवई लेक ओव्हर फ्लो झाल्यानंतर मिठी नदी दुथडी भरून वाहते. तेव्हा सफेद पूल नाल्याचे पाणी मागे दाबले जाऊन जरीमरी, सफेद पूल परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

स्वतंत्र सिव्हरेज आणि ड्रेनेज लाईन नाहीत
मिठी नदीमध्ये परिसरातील झोपडपट्टीमधील सांडपाणी आणि ड्रेनेज लाईनचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे हे पाणी मिठी नदीत सोडले जाऊ नये, ते स्वतंत्र सिव्हरेज आणि ड्रेनेज लाईनमधून वाहून नेण्यासाठी त्या टाकण्याचे नियोजन आहे; पण त्या अद्याप न टाकल्याने मिठी नदीचे प्रदूषण आणि दुर्गंधी वाढत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

झोपड्या तोडल्या; पण घरे मिळाली नाहीत
मिठी नदीसह इतर नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी पालिकेने तानाजी नगर येथील १०५ झोपड्या तोडल्या होत्या, त्यापैकी काहींना मिलिंद नगर चांदिवली येथे घरे मिळाली, मात्र आणखी काही लोकांची पात्रताच न झाल्याने त्यांना घरे मिळाली नाहीत. रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

पालिकेचे आवाहन
नागरिकांकडून नाल्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. तसेच नालेसफाईच्या कामात सदरचा कचरा मोठा अडथळा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मिठी नदीसह नाल्यात आजही कचऱ्याचे ढीग आणि गाळ दिसत आहे. तो गाळ पालिकेने पावसाळ्यापूर्वी काढून सखल भागातील झोपडीधारकांना दिलासा द्यावा.
-रेश्मा म्हात्रे, रहिवासी

मिठी नदीच्या सफाईसाठी पालिका प्रशासन काम करत आहे; पण परिसरातील रहिवाशांनीही नदीत कचरा टाकण्याची सवय सोडावी. तसेच दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत.
-विलास बनसोडे, रहिवासी

अजूनही मिठी नदी पूर्णपणे साफ झालेली नाही. गाळ तसाच पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट दिली असती तर त्यांना मिठी नदीची खरी सफाई दिसली असती.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते

मिठी नदी रुंदीकरण प्रकल्प कार्यक्षेत्रात अडथळा ठरणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता येथील एकूण १४९ बांधकामांचे निष्कासन करण्याची कार्यवाही केली आहे. तेथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने सुरू केले आहे. तसेच उर्वरित बांधकामे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आगामी काळात निष्कासित करण्यात येतील. त्यामुळे मिठीलगतच्या रहिवाशांना यंदा पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही.
-धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त, मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com