हिंदी भाषिकांच्या मतांची विभागणी

हिंदी भाषिकांच्या मतांची विभागणी

हिंदी भाषिकांच्या मतांची विभागणी
-महायुतीचे मताधिक्य घटणार, ‘महाविकास’ची टक्केवारी वाढणार
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबईत मराठी, गुजरातीसह हिंदी भाषिकांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची संख्या लक्षणीय असून त्याच्या मतांची टक्केवारी परिणामकारक आहे. मागच्या निवडणुकीत उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते ही भाजपच्या बाजूने गेली होती. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी दिसली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील स्थानिक परिस्थितीचा परिणाम येथे दिसला. यंदा मात्र या मतांमध्ये विभागणी झाल्याचे दिसले. याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
हिंदी भाषिक प्रभाव असलेल्या परिसरातील मतांची टक्केवारी पाहिली तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन ते तीन टक्के मतदान कमी झाले आहे. कमी झालेल्या मतांचा फटका हा महायुतीला बसेल, तर फायदा महाविकास आघाडीला होईल, असे जाणकारांचे मत आहे. यंदा उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव महाविकास आघाडीसोबत आहेत. त्‍यामुळे मुंबईतील उत्तर प्रदेशवासीयांची मते महाविकास आघाडीला पडली असल्‍याची शक्यता व्यक्त होत आहे.

उत्तर भारतीयांचा प्रभाव
गेल्या १० ते १५ वर्षांपासून मुंबईतील हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यांचा प्रभाव विविध निवडणुकांवरदेखील दिसतो. मुंबईतील काही भागांतील हिंदी भाषिकांच्या मतांवर राजकीय गणितं अवलंबून असतात. हा प्रभाव कोणताही राजकीय पक्ष डावलू शकत नाही. त्‍यामुळे भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुंबईत पाचारण केले जाते. तर शिवसेनेकडून उत्तर भारतीय आघाडीच्या माध्यमातून त्यांना भावनिक साद घातली जाते.

हिंदी भाषिकांचे ‘पॉकेट्स’
मुंबईतील काही भागांमध्ये हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हे उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक ‘पॉकेट्स’ म्हणून ओळखले जाते. दहिसर, बोरिवली, मुलुंड, जोगेश्वरी, अंधेरी, चांदिवली, कलिना हे हिंदी भाषिकांचे सर्वात मोठे पॉकेट्स म्हणून ओळखले जातात. याशिवाय कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द-गोवंडी, वांद्रे, साकीनाका मालवणीतदेखील अलीकडे हिंदी भाषिकांची संख्या वाढली आहे. दक्षिण मुंबईत दखल घेण्यायोग्य हिंदी भाषिकांची संख्या नसली तरी वडाळा, अँटॉप हील परिसरात हिंदी भाषिकांचा प्रभाव असल्याचे दिसते.

लोकसंख्या वाढतेय....
२०११ मधील जनगणनेनुसार, हिंदी भाषिकांचा आकडा हा ४० टक्क्यांनी वाढलाय. २००१ मध्ये ही संख्या २५.८८ लाख होती, तीच दहा वर्षांत ३५.९८ लाख झाली आहे. म्हणजे १० वर्षांत तब्बल १० लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली. तर मराठी भाषिकांमध्ये २.६४ टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. २००१ मध्ये ४५.२३ लाख मराठी मातृभाषिक होते, तेच २०११ मध्ये ४४.०४ लाख झाले आहेत.

हिंदी भाषिक मतदारांचा वाढता प्रभाव...
गेल्या १० वर्षांमध्ये हिंदी भाषिकांची मते निर्णायक ठरत आहेत. हिंदी भाषिकांची लोकसंख्या ही २०११ मधील जणगणनेनुसार असली तरीही गेल्या आठ वर्षांमध्ये मराठी भाषिकांचा उपनगरांकडचा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे या संख्येत आणखी पाच ते आठ लाखांची भर पडली असण्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.

मराठी टक्केवारीही घटली...
हिदी भाषिकांच्या मतांची टक्केवारी वाढत असली तरी मराठी मतांचा टक्का हा दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईतून ठाणे, कल्याण, नवी मुंबई-रायगड जिल्ह्यात मराठी भाषिकांचे स्थलांतर होत असल्याचे दिसते. त्‍यामुळेच ठाणे जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील मराठी टक्का घटला. त्यामुळे अलीकडे पार पडलेल्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषिकांची मते ही हुकमी एक्का ठरत आहेत.

राजकीय पक्षांची चढाओढ
मुंबईतील हिंदी भाषिकांच्या मतांचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष त्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न नेहमीच करतात. भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा तसेच राम मंदिराच्या माध्यमातून या मतांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचे मेळावे आयोजित करून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही हिंदी भाषिकांविरोधातील आपली भूमिका अलीकडे मवाळ केल्याचे दिसते.

युपी-बिहारमधून येणाऱ्यांची संख्या वाढली
डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑप पॉप्युलेशन सायन्सचे राम बी. भगत यांनी त्यांच्या अभ्यासात मराठी टक्का घसरल्याची माहिती नोंदवली आहे. महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या १९६१ मध्ये ४१.०६ टक्के होती, जी २००१ मध्ये ३७.४ टक्के झाली. तर याच काळात उत्तर प्रदेशातून येणाऱ्यांची संख्या १९६१ मध्ये १२ टक्के होती, ती २४ टक्के म्हणजे दुप्पट झाली. बिहारमधून येणाऱ्यांची संख्या ०.२ टक्के होती, ती तब्बल ३.५ टक्क्यांवर गेली आहे.
............................................
लोकसभा मतदान टक्केवारी

उत्तर - २०२४ - २०१९

बोरिवली - - ६२.५ - ६६.०२
दहिसर - - ५८.१२ -- ६२.०४
कांदिवली - ५४.४८ -- ५५.०७
मालाड पश्चिम - ५३.५२ -- ५६.०९
-----
उत्तर पश्चिम

जोगेश्वरी पूर्व - ५७. ११- -६०.०४
गोरेगाव - ५४.५३--५२.०८
अंधेरी प. -५३.६५--५०.०२
अंधेरी पू. -५५.७३ --५७.०३
----
उत्तर पूर्व

मुलुंड -६१.३३--६३.०६
मानखुर्द शिवाजीनगर -५०.४८--४६.०९
---
उत्तर मध्य

चांदिवली -४९.४३ --५०.०७
कुर्ला -५१.८६--५१.०२
कलिना -५१.५८--५५.०८
वांद्रे पू. -५२.२४--५२.०७
वांद्रे प. -५२.१७--५२.०४
------
दक्षिण मध्य मुंबई

वडाळा -५७.११ --५९.०६

उत्तर भारतीयांचा कल हा भाजपकडेच अधिक असेल, असे दिसते. अखिलेश यादवांमुळे काही टक्के मते महाविकास आघाडीकडे फिरण्याची शक्यता आहे. तर बिहारींची मते ही मिश्र असतील, असे दिसते.
-प्रताब आसबे, राजकीय विश्लेषक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com