मुंबईकरांचा सुटकेचा निश्वास

मुंबईकरांचा सुटकेचा निश्वास

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : फलाटाची लांबी आणि रुंदीकरणासाठी ठाणे आणि सीएसएमटी येथे मध्य रेल्वेकडून ६३ आणि ३६ तासांचे दोन्ही मेगाब्लॉक आज (ता. २) दुपारी नियोजित वेळेआधीच संपवले. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या खडतर प्रवासातून मुंबईकरांची सुटका झाली.
मध्य रेल्वेने ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच-सहाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा, तर सीएसएमटी स्थानकातील फलाट १० व ११ च्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३६ तास तासांचा महामेगाब्लॉक घेतला होता. या काळात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जवळपास ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या; तर ७२ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक आणि पुणेला शॉर्टटर्मिनेट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली; तर रविवारी २३५ लोकल फेऱ्या रद्द आणि १३१ लोकल फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्या होत्या. शिवाय लांब पल्ल्याच्या ३१ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या होत्या; परंतु सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळल्याने स्थानकांतील गर्दी कमी होती.
-------------------------
ठाणे स्थानकात अविरत काम
ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाकरिता मध्य रेल्वेचे ५०० पेक्षा जास्त रेल्वे कर्मचारी आणि अभियंते अहोरात्र राबले. त्यामुळे नियोजित वेळेआधीच हे काम पूर्ण झाले. या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या टीममध्ये प्रत्येक संघाचे नेतृत्व करणारे १५ वरिष्ठ विभाग अभियंते आणि १० विविध कंत्राटदारांच्या सुमारे ४०० मजुरांचा समावेश होता. तसेच कामासाठी २ काँक्रिट पंप, ५ पोकलेन, १ रोलर, १ बॅलास्ट ट्रेन, ३२ टँक वॅगन आणि ४ लोकोमोटिव्हचा वापर केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
-------------------------
भारतीय रेल्वेवर पहिल्यांदाच काम
वरिष्ठ अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि कर्मचारी यांच्या टीमने सीएसएमटी येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण करून सुरू केले. या कामामध्ये टर्नआउट्सचे एकत्रीकरण, मांडणी आणि विघटन, ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) पोर्टल्सच्या उभारणीसह सर्व १० लाईन कव्हर करणारे ५३ मीटरचे २ विशेष पोर्टल उभारण्यात आले. तसेच पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी ट्रॅक सर्किट आणि इतर तांत्रिक कामांसाठी २५० अत्यंत कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचारी आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या तितक्याच कार्यक्षम टीमच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. अशा प्रकारचे काम भारतीय रेल्वेवर पहिल्यांदाच झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com