फुगाळे गावात पाणीटंचाईचे चटके

फुगाळे गावात पाणीटंचाईचे चटके

खर्डी, ता. ३ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याशी फुगाळे ही आदिवासी वस्ती आहे. सद्यस्थितीत फुगाळे या आदिवासी वस्तीतील शिवकालीन तलावाची दुरवस्था झाल्याने स्थानिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील विहिरीही कोरड्या ठाक झाल्या आहेत. या ठिकाणी पाणी पाझरणाऱ्या एका विहिरीवर तर रहिवासी पाणी भरण्यासाठी दिवसरात्र जागरण करत आहेत. एका तासाला एक हंडा पाणी जमा करून पायपीट करत आहेत. सध्या सरकार १५०० रहिवाशांसाठी एक टँकर पुरवत आहे. पण ते अपुरे पडत असल्याने दिवसाला तीन टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक महिला करत आहेत. तसेच शिवकालीन तलावाची दुरुस्ती करून पिण्यायोग्य पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील फुगाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शिवकालीन तलाव दुर्लक्षित झाल्याने तलावात जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे पाणी दूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात जानेवारी ते जून या काळात विहिरी तळ गाठतात आणि नदी-नाले कोरडे पडतात. अशा वेळी महिला जिथे पाणी दिसेल, तिथे खड्डा खोदून डबके तयार करतात. दिवसाची रात्र करून महिला पाणी मिळवतात. तलावात पाणी उपलब्ध असूनही ग्रामस्थांना मातीमिश्रीत पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाणी प्यावे लागत असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणा आणि बेजबाबदारपणामुळे दरवर्षी या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असते. पाणी साठवणूकीसाठी जीर्ण बंधारे, तलाव व विहिरींची डागडुजी आणि फुगाळे येथील शिवकालीन तलावाची पावसाळ्यापूर्वी खबरदारी घेतली, तर रहिवाशांची उन्हाळ्यात होणारी तारांबळ सहज टाळता येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात बसणारे पाण्याचे चटके कमी होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी तलावाची डागडुजी करून गाळ काढण्यात यावा. तसेच तलावाच्या सभोवताली पर्यटन स्थळाची निर्मिती केल्यास रोजगार निर्माण होऊ शकतो, असे मत फुगाळे आणि आघणवाडी ग्रामस्थ व्यक्त करत आहे.

तलावाचे संवर्धन गरजेचे
शिवकालीन तलावात आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असल्याचे मत जाणकार लोक व्यक्त करतात. हे तलाव पिण्याच्या पाण्यासाठी गावासाठी वरदान ठरू शकतो. कालबाह्य होत चाललेल्या तलावाचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग आणि प्रशासनाची गरज आहे. गाळ काढला तर तलावाची क्षमता वाढेल. वाढलेली पाणी क्षमता उन्हाळ्यात उपयोगी पडेल. प्रशासनाने यात लक्ष दिले, तर नक्कीच पाणी योजना राबवून हे गाव टँकरमुक्त करता येईल.

तलावाचे ऐतिहासिक महत्त्व
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा तलाव बांधण्यात आला आहे. महाराजांचे मावळे माऊली गडावरून इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील अलंग-मलंग-मदंग गडावर जात असताना घोड्यांना तलावातील पाणी पाजून पुढे प्रस्थान करायचे, असे फुगाळे गावातील वयोवृद्ध मंडळींचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत येथील पाणी दूषित झाले असून, गाळही फार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर करत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
----------------------
फुगाळे गावातील तलावाचे नूतनीकरण केल्यास शिवकालीन वसा जपण्यात येईल. याशिवाय, रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊन पाणीटंचाई दूर होईल. येथील विहिरी कोरड्या ठाक पडल्याने तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा.
- जीवा भला, सरपंच, फुगाळे ग्रामपंचायत (ठाकरे गट)
---------------------------------------------
फुडाळे गावातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्धेनुसार टँकरची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या दोन फेऱ्या करण्याचे नियोजन आहे. तालुक्यात सर्वत्र गाव-खेड्यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. ४२ टँकरने १९३ गाव-पाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
- किशोर गायकवाड, वरिष्ठ लिपिक, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, शहापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com