पोलिस यंत्रणा देखील सज्ज

पोलिस यंत्रणा देखील सज्ज

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे मंगळवारी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. ४५०च्या आसपास पोलिस शहरात विविध ठिकाणी तैनात केल्याची माहिती डिसीपी संजय गुंजाळ यांनी दिली.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक राज्यात पाच टप्प्यांत घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. राज्यात ४८ मतदारसंघांत ही मतमोजणी होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेचे कामकाज पूर्ण झाल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

यंदाच्या निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण या दोन मतदारसंघ प्रतिष्ठेचे बनले आहेत. कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. गेले दोन टर्म त्यांनी निवडणूक जिंकली असून यंदा ते जिंकले तर हॅटट्रिक होणार आहे. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांच्या विजयाबरोबरच शिवसैनिकांची प्रतिष्ठा, निष्ठादेखील यावेळी उफाळून येणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

असा असेल बंदोबस्त
निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन यासोबतच पोलिस प्रशासनदेखील यासाठी सज्ज झाले आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रात सुमारे ४५० पोलिसांचा बंदोबस्त मतमोजणीनिमित्त मंगळवारी तैनात ठेवला आहे. यामध्ये पाच सहायक पोलिस आयुक्त, सहा वरिष्ठ पोलिस निरीक्षक, १४ पोलिस निरीक्षक, ५६ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ३७३ पोलिस अंमलदार, केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com