आज उधळणार विजयाचा गुलाल

आज उधळणार विजयाचा गुलाल

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : अटीतटीच्या झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत मावळचा भावी खासदार कोण, हे मंगळवारी ठरणार आहे. शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात मावळ लोकसभेसाठी थेट लढत होत आहे. मंगळवारी ११३ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दोन जिल्हे व भौगोलिक वैविध्य असलेल्या पुणे व रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.४७ टक्के मतदान झाले आहे. आता मतदारराजाच्या कृपेने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे मंगळवारच्या निकालात स्पष्ट होणार आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. यंदाच्या लोकसभेत घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत होणार असली तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही लढत आहे. दोन्ही सेनेला उत्सुकता; तर भाजपला निकालाची धाकधूक लागली आहे.
मंगळवारी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्षात मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

-------
११३ टेबल आणि फेऱ्यांची रचना
मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या; तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावण्यात येणार असून २५ फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र पाच टेबल याप्रमाणे एकूण ११३ टेबलवर मतमोजणी होईल.

---------
मोबाईलसह प्रतिबंधित वस्तूंना मनाई
निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅल्क्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

---------
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच प्राधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

--------
गुलाल आमचाच
उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या नेत्याच्या विजयासाठी रात्रंदिवस झटत होते. त्यामुळे आपल्याच नेत्याचा विजय होणार, असा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे. त्यातूनच गुलाल आमचाच अशा पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहेत. काहींनी बॅनरही लावले आहेत. पैजांच्या माध्यमातून दावा पक्का असल्याचे दाखविले जात आहे.

------
राजकीय भवितव्य पणाला
श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या वेळी बाजी मारायची आहे; तर वाघेरी यांची स्थानिक स्वराज्य संस्थेनंतरची ही इनिंग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दोघांचेही राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये पणाला लागले आहे. दोघे लढलेही त्याच त्वेषाने. त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. दोन जिल्ह्यांतील नागरिकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

-------
जल्लोषाची तयारी
मावळची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. काहींनी ध्वनिक्षेपकही बुक करून ठेवले आहेत. मिरवणुकीसाठी गाडी सजविण्याची काहींची तयारी सुरू आहे. मिरवणूक कशी व कोठून काढायची, याचे प्लॅन केले जात आहेत. गुलालाचेही ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. दोन्ही बाजूंनी ही तयारी लपूनछपून होत आहे.

------
मतमोजणीच्या अपडेटसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती घेता येईल.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com