शेअरबाजार विक्रमी उंचीवर

शेअरबाजार विक्रमी उंचीवर

शेअरबाजार विक्रमी उंचीवर
सेन्सेक्स व निफ्टीत सव्वातीन टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ

मुंबई, ता. ३ : एक्झिट पोलच्या निकालांमध्ये ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाल्याचे शेअर बाजारांनी आज जोरदार स्वागत केले. सेन्सेक्स व निफ्टी या दोघांनीही सव्वातीन टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ दाखवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळण्याच्या शक्यतेला उत्साहात सलामी दिली. आज सेन्सेक्स तब्बल २,५०७.४७ अंश, तर निफ्टी ७३३.२० अंश वाढला. हे दोनही निर्देशांक आता त्यांच्या सर्वकालिक उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.

शनिवारच्या एक्झिट पोलमध्ये भाजप व ‘एनडीए’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याची अपेक्षा वर्तविल्याने आज बाजारात सकाळपासूनच उत्साह होता. सेन्सेक्सची सुरुवातच ७६ हजार ५८३ पासून झाली व दिवसभर तो साधारण त्याच स्तरावर फिरत राहिला. सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २५ शेअरचे व निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ४३ शेअरचे भाव वाढले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ७६ हजार ४६८.७८ अंशांवर, तर निफ्टी २३,२६३.९० अंशांवर स्थिरावला.

आजच्या जबरदस्त तेजीमुळे अनेक क्षेत्रे, तसेच वैयक्तिक कंपन्यांच्या शेअरने आणि समूहांनी वेगवेगळे उच्चांक नोंदवले. स्टेट बँकेचा शेअर आज ९०५ रुपयांवर गेल्याने त्याचे भांडवली बाजारमूल्य आठ लाख कोटी रुपयांवर गेले. एवढे भांडवली बाजारमूल्य असलेली ती सातवी भारतीय कंपनी ठरली. अदाणी समूहाचे शेअरही सलग दुसऱ्या दिवशी वाढले. गेल्या दोन दिवसांत या समूहाचे भांडवली बाजारमूल्य २.६ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. आज बँक निफ्टीदेखील प्रथमच ५१ हजार अंशांपलीकडे गेला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक आठ टक्के वाढला, तर निफ्टी ऑइल अँड गॅस निर्देशांक सात टक्के वाढला. निफ्टी रिअल्टी इंडेक्स देखील ५.७ टक्के वाढला. शेअर बाजारातील सर्वच्या सर्व म्हणजे १३ क्षेत्रीय निर्देशांक मोठा नफा दाखवीत होते. आज शेअर बाजारातील २,२१० शेअरचे भाव वाढले, तर १,३१० शेअरचे भाव कमी झाले आणि १०३ शेअरचे भाव कालच्या एवढेच राहिले. मेमधील जीएसटीचे वाढलेले संकलन, वित्तीय तूट कमी होणे आणि मॉन्सून नेहमीपेक्षा लवकर आगेकूच करण्याची शक्यता या कारणांमुळेही शेअर बाजारात उत्साह वाढला होता. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे तीन आणि अडीच टक्के वाढले. शेअर बाजारांचा व्होल्टालिटी इंडेक्सही आज घसरला.

‘एनएसई’वर अदाणी पोर्ट १० टक्के वाढला, तर स्टेट बँक व एनटीपीसी साडेनऊ टक्के वाढले. पॉवर ग्रिड नऊ टक्के व ओएनजीसी साडेसात टक्के वाढला; तर ‘बीएसई’वर लार्सन अँड टुब्रो सहा टक्के, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्र आणि महिंद्र, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज पाच ते साडेपाच टक्के वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजने आज तीन हजारांचा टप्पा पार करताना ३,०२१ रुपयांचा बंद भाव दिला. टाटा स्टील चार टक्के, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, टाटा मोटर या शेअरचे भाव तीन ते साडेतीन टक्के वाढले. एचडीएफसी बँक, कोटक बँक या शेअरचे भाव दोन टक्के वाढले.

..
सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये वाढ
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ सरकार पुन्हा आले तर सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक आणि सुधारणेचे वारे पुढे सुरू राहतील, या अपेक्षेत आज सरकारी बँकांचे शेअरही चांगलेच वाढले. यामध्ये बँक ऑफ बडोदा १२ टक्के वाढून त्याने सर्वात जास्त आघाडी घेतली, तर स्टेट बँक साडेनऊ टक्के वाढला. त्याखेरीस पंजाब नॅशनल बँक आणि ॲक्सिस बँक व इंडसइंड बँक चार ते सहा टक्के वाढले. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक या खासगी बँकांच्या शेअरचे भावही दोन ते चार टक्के वाढले.


......
देशाची अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजाराच्या वाढीसाठी ‘एनडीए’चे सरकार येण्याच्या शक्यतेचे शेअर बाजारांनी स्वागत केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक धोरणात स्थिरता राहील आणि एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे आर्थिक वाढीचा कार्यक्रम कायम राहील, या अपेक्षेत गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. अशा स्थितीत शेअर बाजार नवीन उच्चांक गाठेल, अशी अपेक्षा आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.

..
रुपया २८ पैसे वाढला
नवी दिल्लीत पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ सरकार येणार, असा कल एक्झिट पोलमध्ये दिसल्याने भारतीय रुपयादेखील आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २८ पैसे वाढून ८३.१४ वर स्थिरावला. रुपयाचा हा गेल्या दोन महिन्यांतील उच्चांक आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी रुपया ८३.१३ अशा उच्चांकी स्तरावर बंद झाला होता. शेअर बाजारात झालेली जोरदार वाढ, तसेच परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा भारतात परत येणे यामुळे रुपया वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आज रुपयाचे व्यवहार ८३.०९ वर सुरू झाले. दिवसभरात त्याने ८२.९५चा उच्चांक व ८३.१७चा नीचांक केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com