रायगड निवडणूक

रायगड निवडणूक

रायगडकरांचे सहानुभुतीच्या लाटेविरोधात मतदान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी नेहमी लाटेच्या विरोधात मतदान केले आहे. आताही इंडिया आघाडीच्या बाजूने सहानुभुतीची लाट असतानाही महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तब्‍बल ८२ हजार ७८४ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. सलग दोन वेळा तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव करीत आपण सक्रिय खासदार असल्‍यानेच मतदारांनी आपल्‍याला पुन्हा संधी दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे सुनील तटकरे यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. त्याच वेळी राजकीय संन्यासानंतर अनंत गीते राजकारणात सक्रिय झाल्‍याने अटीतटीची लढाई झाली होती. गीते यांना चार लाख २३ हजार १३७ मते मिळाली आहेत. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडणार असल्याने लोकसभेतील जय पराजयाची गणिते आतापासूनच मांडली जात आहेत. तटकरेंच्या विजयात पेण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्‍याचे मानले जात आहे. तटकरेंच्या उमेदवारीस विरोध करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील पाटील यांचा पर्याय पक्षश्रेष्‍ठींकडे मांडला होता. मतदानाला जेमतेम एक आठवडा शिल्लक असताना पेण मतदारसंघातील मतदारांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न महायुतीला करावा लागला होता. पहिल्या फेरीपासून पेण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेली आघाडी गीतेंना शेवटपर्यंत तोडता आली नाही.

............

विजयाचा गुलाल सोशल मीडियावर
श्रीवर्धन, ता. ४ (बातमीदार) : सुनील तटकरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सोशल मीडियावरही विजयाचा गुलाल उधळलेला पाहायला मिळाला. अनेकांच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तटकरेंच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
खासदारकीसाठीची निवडणूक झाल्यापासून तटकरे समर्थकांमध्ये वेगळीच धाकधूक होती. मुस्लीम मतदारांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अनंत गीते यांना मतदार केल्याची चर्चा होती. मात्र निकालातून तसे काही झाल्याचे दिसून आले नाही. ८० हजारांहून अधिक मताधिक्याने निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्‍साह संचारला होता.
विशेष म्हणजे काल रात्रीपर्यंत बॅनर प्रिंट होत असतानाचे व्हिडिओ काढून तसेच रिल्स बनवून अनेकांनी समाजमाध्यमांवर ठेवले होते. निकालाच्या दिवशी सकाळपासून जसजसा कल तटकरेंच्या बाजूने जात होते, तसतसे कार्यकर्त्यांत उत्साह पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील कार्यकर्ता ते पक्षाचे पदाधिकारी हे तटकरेंच्या विजयात आनंद साजरा करताना दिसले.

...................


...............
रोह्यात बाईक रॅली
कार्यकर्त्यांकडून फटाक्‍यांची आतषबाजी
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा पुन्हा एकदा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
तटकरे यांच्या विजयाची घोषणा होताच रोहे-अष्टमी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोहा बाजारपेठ, अष्टमी गाव व अनेक ठिकाणी बाईक रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्‍या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमला होता. युवा कार्यकर्ते दानिश पठाण, फरहान पानसरे, अदनान नाडकर, हुनैन दळवी, मझर चौगले, फैझान गोलंदाज, फहीम पठाण, अमन गोलंदाज, साद कासकर, रमीज नाटूस्कार, ताबिश लद्दू, अरसलान किरकिरे आदींनी रोहे अष्टमी भागात बाईक रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी केली.

रोहा : सुनील तटकरे निवडणुकीत विजय झाल्यानंतर रोहा, अष्टमीत
फटाक्यांची आतशबाजी करून कार्यकर्‍त्‍यांनी आनंद साजरा केला.


----------------

निकालापूर्वी ग्रामदैवत धावीर महाराजांचे दर्शन
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः निकालाच्या पूर्वसंस्‍थेला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत धावीर महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरासमोर सुरू असलेल्‍या खुल्या मंडपाच्या कामाची पाहणी केली. त्‍यानंतर ते मतमोजणीसाठी अलिबागकडे रवाना झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, धावीर समिती अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, राजू जैन, अहमद दर्जी, व्यापारी मंडळ अध्यक्ष विलास गुजर, मनोज जैन आदी उपस्थित होते.

रोहा ः निकालाच्या पूर्वसंध्येला सुनील तटकरे यांनी ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचे दर्शन घेतले.
..............

दिघी पोर्टमध्ये कामगारांचा जल्‍लोष
दिवेआगर, ता. ४ (बातमीदार) ः रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी प्रचंड बहुमताने निवडून आलेल्‍या सुनील तटकरे यांच्या विजयाचा दिघी पोर्टमधील कामगारांनी जल्‍लोष केला. तटकरे यांनी कामगारांच्या समस्‍यांचे सोडवण्याचा नेहमीच प्रयत्‍न केला आहे. त्‍यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली लावल्‍याने कामगारांनी आनंद व्यक्‍त केला.

................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com