डोंबिवलीत कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण

डोंबिवलीत कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण

डोंबिवलीत कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दमदार विजय मिळवला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत जल्लोष आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. महायुतीकडून खासदार शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. विजयाची हॅट्ट्रीक सोबतच या मतदारसंघात शिंदे गटाचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येणे हे शिंदे यांचे उद्दिष्ट होते. पहिल्या फेरीपासूनच शिंदे यांनी घेतलेली लीड कायम राखली. विजय संपादन केल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होईल असे वाटत होते, मात्र सकाळी साडेदहापर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर शुकशुकाट होता. त्यानंतर हळुहळु कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. दुपारी बाराच्या दरम्यान शिंदे पाच सहा फेऱ्यांमध्ये लाखाची लीड घेत आघाडीवर राहिले. यानंतर डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, मनसेचे प्रकाश भोईर, रुपेश पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेर जमत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.

पोलिस अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
एक ते दीडच्या सुमारास ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत विजयाच्या गुलालाची उधळण केली, तसेच प्रत्येक फेरीनंतर या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेत पोलिस प्रशासनाकडे त्यांची तक्रार केली. यावेळी काही प्रमाणात पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, परंतु पोलिसांनी त्वरित दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिती आटोक्यात आणली. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी येथून काढता पाय घेतला.

नातवाचे कौतुक
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे त्यांचे आजोबा संभाजी शिंदे, आई लता शिंदे यांच्यासह डोंबिवलीत दाखल झाले. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल- ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. खासदार शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी सायंकाळपासून उल्हासनगर, अंबरनाथ, कळवा मुंब्रा येथून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत येण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे आजोबा संभाजी शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. माझ्या नातवाने भरपूर विकासकामे केली आहेत, त्यामुळे हा विजय त्याचा झाला आहे. आता आणखी कामे त्याला करायची आहेत, मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रीया संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com