मुंबईत आवाज शिवसेनेचाच...

मुंबईत आवाज शिवसेनेचाच...

विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबईत लढवलेल्या चारपैकी तीन जागा जिंकत मुंबईत आवाज कुणाचा, या प्रश्‍नाचे उत्तर ठाकरेंच्या शिवसेनेने दिले आहे. मुख्यमंत्री पद गेले, पक्ष फुटला, निवडणूक चिन्ह गमावले, या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई होती. मुंबईत मराठी माणूस हा आमच्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केले आहे. तीन दशकानंतर भाजपच्या छायेतून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर शिवसेनेने मुंबईत हा दणदणीत विजय संपादन केला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढील सर्वात कठीण आव्हान मुंबईत होते. पक्षाचे एक एक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळाला लागत होते. मातोश्रीशी निष्ठा राखून असलेल्या शिवसेना नेत्यांमागे ईडी, पोलिस तपासाचा ससेमीरा लागला. चौकशी यंत्रणांचा जाच एवढा मोठा होता, की अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकरसारख्या निष्ठावान शिवसैनिकाला पक्ष सोडावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईत पक्षाचा आधार वाढवण्यासाठी आक्रमक प्रयत्न केले. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईत पक्ष संघटना मातोश्रीसोबत कायम होती, ही पक्षासाठी जमेची बाब होती.

शून्यातून विश्व
अशा प्रतिकूल परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी प्रसंगी आक्रमक भूमिका घेत जागावाटपात हव्या त्या चार जागा पदरात पाडून घेतल्या. पक्षाचे उमेदवार फार पूर्वीच ठरले होते. उमेदवारांची घोषणाही सर्वात पहिली शिवसेनेने केली. इतर पक्ष जेव्हा उमेदवार जाहीर करण्यासाठी चाचपडत होते, त्या वेळी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला होता. त्यामुळे प्रचारात शिवसेनेने पहिल्यापासून आघाडी घेतली होती. मराठी माणसाची सहानुभूती, सोबतीची पहिल्यांदाच दलित आणि मुस्लिमांची साथ या जोरावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अटीतटीच्या लढाईत चारपैकी तीन जागा जिंकल्या. या वेळी आघाडी धर्म निभावत काँग्रेस उमेदवारांसाठी शिवसेनेने काम केले. महत्त्वाचे म्हणजे तीन जांगावर शिवसेना (ठाकरे) गटाच्या उमेदवाराविरुद्ध एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार पारंपरिक ‘धनुष्यबाणा’वर उभे होते. नवे चिन्ह हातात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी तीन जागांवर विजय मिळवला, हे विशेष.
....
विजयाचा परिणाम
विजयामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. राज ठाकरे, त्यानंतर एकनाथ शिंदेंसारखे नेते सोडून गेले, तरी मुंबईत मराठी लोकांचा पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आहे. हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. या विजयाचा मोठा परिणाम आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांवर होईल. विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरू शकेल, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असलेले हरिष वानखेडे सांगतात. या सर्व निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे राज्यातील एक मोठे आणि प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे आले आहे.
....
आव्हान कायम
चारपैकी तीन जागांवर शिवसेनेला विजय मिळाला असला, तरी पक्षाच्या उमेदवारांचे विजयाचे मताधिक्य फार मोठे नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा असताना जेमतेम काही मतांनी अमोल कीर्तिकरांना यांचा पराभव झाला. याशिवाय अरविंद सांवत यांनाही अपेक्षित असे मताधित्य घेता आलेले नाही. यासोबत मुंबईला लागून असलेल्या पालघर, ठाणे जिल्ह्यात पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे) गटाचे अस्तित्व मुंबईत संपले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com