मोदींच्या सभांचा परिणाम मुंबईकरांवर शून्य

मोदींच्या सभांचा परिणाम मुंबईकरांवर शून्य

मोदींच्या सभांचा परिणाम मुंबईकरांवर शून्य
महायुतीचा पराभव; दक्षिण मध्य, उत्तर पूर्वमध्ये राजकीय नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा किंवा रोड शो म्हटलं की तेथील उमेदवाराचा विजय पक्का, हे गणितच मुंबईत फसले. मोदी यांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. तसेच मिहीर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर परिसरात भव्य रोड शो केला होता; मात्र दोन्हीही जागेवर संबंधित उमेदवारांचा पराभवही झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे मतदारसंघातील वातावरण पुरते ढवळून निघाले होते. नरेंद्र मोदी यांची सभा आपल्या मतदारसंघात मिळावी म्हणून अनेक उमेदवार प्रयत्नही करत होते; मात्र त्यांच्या या सभांचा कोणताच प्रभावी परिणाम मतदारांवर झाला नाही. नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील उमेदवारांबरोबरच राहुल शेवाळे यांच्या विजयासाठीही विशेष सभा घेतली आणि विकासाला मतदान करण्याचे आवाहन केले होते; तर घाटकोपर येथेही कोटेचा यांच्या विजयासाठी तब्बल साडेचार तासांचा मोदी यांनी रोड शो केला; मात्र त्या रोड शोलाही लोकांनी मनावर घेतले नसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
रोड शोची कोंडी भोवली
मोदी यांनी घाटकोपर येथे घेतलेल्या रोड शोमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवली होती. त्यामुळे पूर्व उपनगरात मोठी कोंडी झाली होती. तसेच सुरक्षेच्या काराणास्तव ऐनवेळी घाटकोपर-जागृतीनगर दरम्यानची मेट्रो सेवा दोन तास बंद ठेवली होती. त्यामुळे मेट्रो प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. याचा परिणाम मुंबईकरांच्या नाराजीवर झाला होता. तीच कोटेचा यांच्याबरोबर महायुतीच्या उमेदवारांना भोवली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com