ठाण्यात शिंदेशाहीचाच करिश्मा

ठाण्यात शिंदेशाहीचाच करिश्मा

ठाण्यात शिंदेशाहीचाच करिश्मा
विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली

हेमलता वाडकर
ठाणे, ता. ५ : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून ठाण्यात केवळ शिंदेशाहीचाच करिश्मा चालतो यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्याच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व ताकद पणाला लावून आपला किल्ला मजबुतीने लढवला. त्याचे फलीत म्हणून शिवसेना शिंदे गटाचा शिलेदार दिल्लीत जाणार आहे, पण त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांचीही रंगीत तालीम यानिमित्ताने झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या मतांची गोळाबेरीज केली असता येथील सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीची ताकद वाढल्याचे दिसते.

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १३ लाख ९ हजार ३०२ इतके मतदान झाले होते. विजयी आकडा गाठण्यासाठी उमेदवाराला किमान साडेसहा लाखांपेक्षा जास्तीचा आकडा पार करणे आवश्यक होते. या रणनीतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली आहे. त्यांनी २०१४ पासून सलग दोन वेळा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. प्रतिष्ठा आणि अस्तित्वाच्या या लढाईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ७,३४,२३१ इतकी मते मिळवत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा हॅट्ट्रिकचा रथ रोखला आहे. अटीतटीच्या लढतीत विचारे यांना पाच लाख १७ हजार २२८ मते मिळाली असून म्हस्के यांनी तब्बल दोन लाख १७ हजार २ मतांच्या आघाडीने विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये राजन विचारे यांना मिळालेल्या सात लाख ४० हजार ९६९ मतांच्या जवळ नरेश म्हस्के खासदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत पोहोचले आहेत.

महायुतीचे उमेदवार असल्यामुळे नरेश म्हस्के यांना भाजपच्या मतांची मदत मिळाली आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाने शेवटच्या दहा दिवसांत ऐरोली, बेलापूर ते मिरा- भाईंदरपर्यंतचा भाग पिंजून काढला. महिला बचत गट, महिला आघाडीचीही शक्ती या विजयामागे भक्कम उभी राहिली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केल्यामुळे त्यांना बळ मिळाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा गाजली. निष्ठेच्या जोरावर राजन विचारे निवडणुकीच्या मैदानात उतरले, पण शिवसेनेचा बालेकिल्ला आणि भाजपचा गड असे समीकरण असलेल्या ठाण्यात त्यांना मतांचा तोटा झाल्याने आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकीत आयुष्यात पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या निमित्ताने आता ठाण्यात ठाकरे गटाची शिल्लक ताकदही कमी होण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, या सर्व धामधूममध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकदीसह महायुतीचे बळही सर्व विधानसभा मतदारसंघात वाढल्याचे दिसत असले तरी ठाकरे गटाने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे त्यांना हलक्यात घेण्याची चूक शिवसेना शिंदे गट करणार नाही.

निवडणुकीत गाजलेले मुद्दे
- गद्दारी विरुद्ध निष्ठा हा मुद्दा या निवडणुकीत प्रचंड गाजला
- उमेदवारीवरूनही नाराजी नाट्य अखेरच्या घटकेपर्यंत सुरू होते.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उकरलेला परप्रांतीय मुद्दा तर उद्धव ठाकरे यांनी थेट संघ कार्यकर्त्यांना घातलेली सादही गाजली.

विजयाच्या जमेची बाजू
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व आमदार हे महायुतीचे आहेत, तर माजी नगरसेवकही महायुतीचे आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फौज, आर्थिक बळ असे अनेक जमेच्या बाजू नरेश म्हस्के यांच्या विजयाच्या मागे आहेत. नरेश म्हस्के हे स्वत: उत्तम संघटक असून निवडणुकांचा त्यांना अनुभव आहे. त्याचा फायदा त्यांना झाला.

विजय मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा
वास्तविक नरेश म्हस्के यांचा विजय झाला असला तरी त्यांच्याच म्हणण्यानुसार हा विजय नमो सैनिकाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम सर्वार्थाने भक्कम साथ नरेश म्हस्के यांना मिळाली. शिंदे यांनी म्हस्केंसाठी रोड शोही घेतले. रस्त्यावरील मिरवणुकीत सामील झाले. उमेदवार कोण हे पाहू नका, माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, ध्यानात ठेवा अशी ‘समजूत’ त्यांनी काढली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्तेही चार्ज होत असत. त्यामुळे खासदार म्हणून नरेश म्हस्के विजयी झाले असले तरी खरा विजय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचाच झाला असे म्हणण्यास हरकत नाही.

राजन विचरे यांच्या पराभवाची कारणे
- एकीकडे सत्ता, आर्थिक ताकद, पदाधिकाऱ्यांची फौज तर दुसरीकडे केवळ निष्ठा आणि निष्ठावंत मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते अशी ही लढत होती, असे म्हटल्यास हरकत नाही.
- ठाणे हा शिवसेनेचा गड असला तरी भाजप किंवा संघ विचारी मतदारांचा मतदासंघ आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला त्यामुळे येथून सर्वाधिक मते म्हस्के यांच्या पारड्यात पडली.
- ठाणे शहरात संघविचारी मतदार असल्याने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मते म्हस्के यांच्या ओंजळीत पडल्याचे दिसते.

ओवळा- माजिवड्यात सर्वाधिक माताधिक्य
ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार होते. त्या तुलनेत या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला सर्वाधिक दीड लाखाहून अधिक मतदान झाले आहे. या मतदारसंघाचे नेतृत्त्व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक करतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात दिलेला निधी दिला होता. येथे झालेल्या विकासकामांमुळे शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक मतदान झाले असल्याचे समाधान आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडीतही शिवसेना शिंदे गटाला लाखाहून अधिक मते मिळाली आहेत, पण शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांनीही ६६ हजारांहून अधिक मते या मतदारसंघात मिळवली आहेत, हा मुख्यमंत्र्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

ठाणे लोकसभा मतदारसंघ
विधानसभा एकूण मतदान नरेश म्हस्के राजन विचारे नोटा
कोपरी पाचपाखाडी १८४५२१ ११११३५ ६६२६० २४९१
ठाणे शहर २१२७९८ १२६४३१ ६६२६० २९५६
ओवळा-माजिवडा २५८२४८ १५४०३८ ९२६३९ ३८५१
मिरा-भाईंदर २२३८९० १२७९१३ ८७२६३ २७६२
ऐरोली २२१७४८ १०९६१८ ९९८२० २७३४
बेलापूर २०३२१४ १०२९७४ ९०६६२ २९७४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com