शहापूर मतदारसंघात जिजाऊ एक नंबर

शहापूर मतदारसंघात जिजाऊ एक नंबर

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा
खर्डी, ता. ५ : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील (भाजप) यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. तर जिजाऊ विकास पार्टीचे नीलेश सांबरे यांना तीन नंबरची मते मिळाली आहेत. शहापूर विधानसभा मतदारसंघात तर सांबरे यांच्या पाठिशी जात पॅटर्न राहिल्याने त्यांनी एक नंबरची मते मिळवली आहेत. त्यां‍चे काही वर्षांपासून सामाजिक कामे आणि जात पॅटर्न असाच राहिला आहे. आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उभे करून निवडून आणू शकतात, असे वाटते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे आगामी निवडणुकीतील आराखडे व गणिते बिघडवू शकतात, याची खात्री अनेकांना झाली आहे. त्यामुळे कोणता राजकीय पक्ष आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषदेसाठी जिजाऊशी हातमिळवणी करतो? याकडे सर्वच मतदारांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील (४३५२१), सुरेश म्हात्रे (५४७०१) आणि नीलेश सांबरे (७४६८९) असे मतदान झाले आहे. यात नीलेश सांबरे यांनी विजयी उमेदवार म्हात्रे यांच्यापेक्षा २० हजारांच्यावर जास्त मते घेऊन शहापूर विधानसभा मतदारसंघात एक नंबर मिळवला आहे. त्यामुळे या मतदारसंघात येऊ घातलेल्या विधानसभा, जिप-पंचायत समिती निवडणुकीत जिजाऊची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ती इतर राजकीय पक्षांची विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीची गणिते बिघडवणारी असतील, यात शंका नाही. मतमोजणीत तीनही उमेदवारांच्या शहापूर विधानसभेची आकडेवारी जाहीर झाली असून, त्यानुसार आलेल्या आकडेवारीवरून विधानसभेच्या राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या कामगिरीचा लेखाजोका तपासला जाणार आहे. त्यामुळे कुठल्या इच्छुक उमेदवाराचे गणित जुळणार? तर कोणाचे गणित बिघडणार? याकडे सर्वच मतदारांचे लक्ष लागले आहे. आगामी युती आणि आघाडीच्या वाटपात शहापूर विधानसभा कोणाच्या वाटेला येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विधानसभा उमेदवारीसाठी धडपड
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडील विधानसभेचे उमेदवार आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी प्रचार करताना दिसून आले. शहापूर तालुक्यात जिजाऊ विकास पक्षही त्यांनी केलेल्या सामाजिक व वैयक्तिक कामांमुळे लोकसभेत मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करून विधानसभेसाठी आपली ताकद आजमावणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शहापूर विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची प्रचार करताना धडपड दिसून येत होती. मविआ व महायुती यांच्यातील विधानसभा जागा वाटपात मागील विधानसभेत जिंकलेल्या उमेदवाराला त्याच पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर सहयोगी पक्षातील इच्छुक उमेदवारही उमेदवारी मिळण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते. या वेळी ते प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचून आपली भूमिका मांडण्यासाठी समर्थकांना घेऊन प्रचार करतान दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com