‘मुख्यमंत्री हरित ठाणे’ला प्रारंभ

‘मुख्यमंत्री हरित ठाणे’ला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरुवात बुधवारी (ता. ५) सकाळी पोखरण रस्ता क्र. १, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका हद्दीत एक लाख झाडे लावण्याचे ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात बुधवारी महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खासगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे पाच हजार झाडे लावून करण्यात आली आहे. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडे लावण्यात आली. वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी या वेळी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडे यांची माहिती उपस्थितांना दिली. झाडांविषयी विशेष आस्था असलेले राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनीलगतच्या पदपथाशेजारी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान विभाग) सचिन पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम आदींनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.

महापालिका विनामूल्य झाडे देणार
बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. पालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, सरकारचे सर्व विभाग, संरक्षण दल, खासगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्याने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला.
.......................
बांबूच्या लागवडीस प्राधान्य
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात; तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
...............................
विभागप्रमुखांकडे पालकत्व
अभियानात एकेका विभागाचे पालकत्व महापालिकेच्या एकेका विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभागप्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागाला पुढील वर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
............................
नागला बंदर येथे मियावाकी वन
नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. कमी जागेत, कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून, जैवविविधता संवर्धनासाठीही उपयुक्त आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सीताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी येथे वृक्षारोपण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com