छतांवर ताडपत्रीचा आधार

छतांवर ताडपत्रीचा आधार

ठाणे, ता. ६ (बातमीदार) : पावसाळा आला की लगबग सुरू होते ती पावसाळापूर्व कामांची. विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, छत्र्यांची खरेदी, तर चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची छतांवर ताडपत्री टाकण्याची लगबग सुरू होते. आता पावसाला कधीही सुरुवात होणार असल्याने चाळींमध्ये राहणारे नागरिक हार्डवेअरच्या दुकानांमध्ये ताडपत्री घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ताडपत्रीच्या दरात कोणतेही भाव न वाढल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नागरिकांची पावसाळापूर्व घरांच्या किरकोळ कामांना सुरुवात झाली आहे. यासाठी ठिकठिकाणी चाळीतील घरांवरील छपराची साफसफाई सुरू आहे. तर विविध चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पावसामुळे होणारी गळती थांबावी, यासाठी ताडपत्री टाकली जात आहे. याशिवाय पावसाळ्यात विजेची समस्या निर्माण होऊ नये, याकरता वाहिन्यांची दुरुस्तीही केली जात आहे. चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांबरोबरच छोट्या-मोठ्या दुकानदारांना पावसाळ्यात होणारी गळती टाळण्यासाठी ताडपत्रीचा मोठा आधार वाटतो. सध्या दुकानांमध्ये अनेक रंगांतील आणि विविध आकारांतील टिकाऊ ताडपत्री विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. बाजारात विविध आकारांच्या आणि कमी-जास्त जाडीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी असून, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुकानांमध्ये ताडपत्री ही ५० ते १०० रुपये मीटर; तर प्लास्टिक ३५ ते ७० रुपये मीटर, नायलॉन धागा १८० रुपये किलो मिळत आहे.

सध्या अनेक ठिकाणी इमारती उभारण्यात आल्यामुळे झोपड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही काही रहिवासी, मासेविक्रेते, भाजीविक्रेते, दुकानदार आदींना पावसाळ्यात ताडपत्रीची गरज भासते. त्यामुळे खरेदीसाठी नेहमीच ग्राहक येत असतात.
- किसन चौधरी, विक्रेते

अवकाळी पाऊस पडल्यानंतर नागरिकांनी घराची डागडुजी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीचे आणि यंदाचे भाव सारखेच आहेत.
- राजू जैन, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com