विक्रमगड बाजारात सुक्या मासळीवर जोर

विक्रमगड बाजारात सुक्या मासळीवर जोर

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : पावसाळा आला की, विक्रमगड आणि तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतील आदिवासी शेतकरी शेतीपूर्व कामाला लागतो. त्यामुळे त्याला पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहाट (खरेदी) करण्यास वेळ मिळत नाही. यासाठी पावसाळ्यापूर्वीच मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदीबरोबर विविध सुकी मासळी घेत आहेत. तीन ते चार महिने पुरेल असा साठा करून ठेवतो. सध्या या आगोट खरेदीला विक्रमगड बाजारात गर्दी होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनी आगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. प्रत्येक गाव-पाड्यांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात मॉन्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. महागाईचा भस्मासुर डोक्यावर मांडरत असतानाही खरेदी केली जात आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टींसाठी अडचणी येत असतात. ग्रामीण भागात तर हवी ती वस्तू मिळेलच, याची खात्री नसते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही सुरू झाली आहे.
पालघर, वसई, सातपाटी, डहाणू, वाणगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छीमारी व्यवसाय चालतो. उन्हाळ्यात विकली न गेलेली ताजी मासळी व्यावसायिक सुकवतात आणि त्याची विक्री करतात. विक्रमगडच्या नाक्यावर परिसरात; तसेच आजूबाजूच्या खेड्यावरील परिसरात साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात सुकी मासळी सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. सध्या बोंबील किलोमागे १५० रुपये वाढलेले आहेत. तर बांगडा, आंबडकाड, मांदेली, कोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले आहेत. सुक्या मासळीचे भाव गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले असले, तरी पावसाळ्यासाठी ती खरेदी केली जात आहेत.


डोक्यावर टोपले घेऊन गावोगावी
सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदी भागांतून मासळी विक्रेत्या महिला विक्रमगड आणि परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा आदी खेड्या-पाड्यांत आठवडी बाजारात आपली दुकाने थाटत आहेत. इतर दिवशी त्या डोक्यावर टोपले घेऊन गावोगावी फिरत असतात. बोंबील, कोलीम, आंबडकाड, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदेली, सुकट, खारे अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळींचा समावेश आगोटमध्ये आहे.

सुक्या मासळीचे भाव (किलो, रुपयांत)
बोबील ६००-७००
मांदेली २००-३००
कोलीम ५००-६००
खार ९००-१०००
सोडे ९००-१०००
सुकट ५००-६००
बागडा (नग) १५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com