पावसाळापूर्व तयारीसाठी बैठकांचा धडाका

पावसाळापूर्व तयारीसाठी बैठकांचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः पावसाळ्यात पडणारे खड्डे २४ तासांत बुजवले जातील, याची काळजी घ्या. तसेच १० जूनपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करताना शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर बॅरिकेड्स, बांधकाम साहित्य दिसता कामा नये, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामे दहा जूनपर्यंत पूर्ण करण्यासह वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या सर्व कार्यवाहीचा अतिरिक्त आयुक्त बांगर सातत्याने आढावा घेत आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे.
---------------------------
मास्टिक कुकरला जीपीएस
सर्व विभागांतील मास्टिक कुकर हे सुस्थितीत, तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करण्यात यावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. तसेच मास्टिकचे उत्पादन व उपलब्धतता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी आतापासूनच खातरजमा करून ठेवावी. तसेच खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे, असेही त्यांनी सांगितले.
----------------------------
२४ तासांत खड्डे बुजणार
मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सअॅप, चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग अॅप्लिकेशन, तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक आदी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर, तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेल्या खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासांत पूर्ण करण्यात यावी, असेही बांगर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com