पालिकेच्या पथकावर पवईत दगडफेक

पालिकेच्या पथकावर पवईत दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पवई गाव आणि मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर असलेल्या सुमारे ५०० बेकायदा झोपड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर रहिवाशांनी गुरुवारी दगडफेक केली. यात पथकातील १० अधिकारी-कामगार आणि १५ पोलिस जखमी झाले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावावर लाठीमार केला. यात अनेक महिला-पुरुष जखमी झाले आहेत. सुमारे दीडशे जणांची पोलिसांनी धरपकड केली आहे.
पवई गाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर कामगारांसाठी सुमारे ५०० झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाईचे आदेश राज्य मानव अधिकार आयोगाने मुंबई महापालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालिका अधिनियमातील कलम ४८८ मधील तरतुदीनुसार झोपडीधारकांना पालिकेने १ जूनला कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. त्यात ४८ तासांच्या आत स्वत:हून अतिक्रमणे न हटवल्यास महापालिका प्रशासन कारवाई करेल, असे नोटिशीत नमूद केले होते, अशी माहिती पालिकेने दिली. मात्र, या झोपड्या न हटवल्याने पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच निष्कासनाची कारवाई सुरू केली. या वेळी रहिवाशांची पथकातील कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली. मात्र, कारवाईबाबत ठाम भूमिका घेतल्याने जमावाने पथकावर जोरदार दगडफेक केली. यात महापालिकेचे पाच अभियंते, पाच कामगार आणि १५ पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावावर लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, येथील भूखंड विकसकाच्या घशात घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-----
हल्ले सहन करणार नाही!
हल्ल्यात जखमी महापालिका कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट दिली. कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देतानाच कायद्याचे पालन करून ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com