मिशन मॉन्सून

मिशन मॉन्सून

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असून कोणत्याही क्षणी पाऊस मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची कोंडी होऊ नये, झाडे, दरडी कोसळून अपघात होऊ नये, यासाठी महापालिका, रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएने मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. नालेसफाई झाली असून रेल्वेने आपल्या ट्रॅकमधील कल्व्हर्ट साफ केले असून ठिकठिकाणी पंप बसवले आहेत. रस्त्यावरील झाडांच्या छाटणीचे कामही पूर्ण केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संबंधितांना तत्काळ मदत करता यावी, यासाठी नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन क्रमांकासह यंत्रणा सज्ज आहेत. यंदा पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी पालिका तसेच संबंधित यंत्रणांनी काय तयारी केली आहे, त्याचा ‘दैनिक सकाळ’ने आढावा घेतला आहे.
----------

१) एमएमआरडीए
प्रकल्पस्थळी आपत्कालीन टीम, रुग्णवाहिका तैनात
मुंबई शहर, उपनगर आणि एमएमआर क्षेत्रात एमएमआरडीएने रस्ते, सागरी सेतू, उड्डाणपूल, पाणीपुरवठा, कोस्टल रोड अशा विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या कामाच्या ठिकाणी पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणात मॉन्सूनपूर्व कामाची तयारी केली आहे. प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रहिवासी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय कमी करण्यासाठी व्यवस्था केली आहे. झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे अशा विविध बाबींवर नागरिकांना नियंत्रण कक्षाची मदत घेता येणार आहे.
---------
३०० जणांची टीम
मॉन्सूनदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा, यासाठी प्रत्येक मेट्रो प्रकल्पस्थळी एक अभियंता आणि १० मजुरांची टीम (आपत्कालीन दल) तैनात ठेवले आहे. मेट्रो प्रकल्पस्थळी अशा एकूण १९ आपत्कालीन टीम तैनात असून त्यात ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत.
---------
आपत्कालीन केंद्र
एमएमआरडीएने ठिकठिकाणी १८ आपत्कालीन केंद्र, १८ देखभाल वाहने आणि १७ रुग्णवाहिकांची तरतूद केली असून ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे.
----------
अटल सेतूवर पंप, आपत्कालीन दल
अटल सेतूवर वाहतूक अविरत सुरू राहावी, पाणी साचू नये, म्हणून ड्रेनेज सिस्टीमच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसवले आहेत. तसेच अटल सेतू प्रकल्पासाठी एक अभियंता आणि १० मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केले आहे. अटल सेतूसाठी आपत्कालीन टोल फ्री क्रमांक - १८००२०३१८१८.
---------
सर्व यंत्रणेशी समन्वय
मॉन्सून काळात नागरिकांकडून एमएमआरडीएच्या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींचे निरसन आणि निवारण करण्यासाठी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था या आपत्ती नियंत्रण संस्थांशी समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच आलेली तक्रार एमएमआरडीएशी संबंधित नसल्यास ती पालिका, एमएसआरडीसी अशा संबंधित संस्थांना कळविण्यात येते. त्यासोबतच सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबतचे अभिप्राय तक्रार करणाऱ्या नागरिकांस कळवले जाईल.
--------
मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील पायाभूत आणि वाहतूक सुविधा मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएने अनेक प्रकल्प हाती घेतले असले तरी पावसाळ्यात त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये किंवा प्रकल्पस्थळी अपघात होऊन जीवित, वित्त हानी होऊ नये, यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
---------
संपर्क क्रमांक
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संपर्क साधता यावा, म्हणून नियंत्रण कक्ष तयार केला आहे.
- ०२२-२६५९१२४१
- ०२२-२६५९४१७६
- ८६५७४०२०९०
- १८००२२८८०१ (टोल फ्री)
-----------------------------

२) मोनो, मेट्रो
हवेचा वेग मोजणारी यंत्रणा
पावसाळ्यात विनाअडथळा धावण्यासाठी मोनो, मेट्रो सज्ज झाली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने मुंबईत चेंबूर ते सात रस्ता मोनो रेल्वे तर अंधेरी-दहिसर-गुंदवलीदरम्यान मेट्रो चालवल्या जातात. पावसामुळे मोनो-मेट्रो सेवा खंडित झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे दोन्ही सेवा अखंडित सुरू राहावी, म्हणून हवेच्या वेगाचे निरीक्षण करून मेट्रो संचलनाचे नियोजन करण्यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या दहा मेट्रो स्थानकांवर ॲनिमोमीटर बसविले आहे. हे ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजत असल्याने रिअल-टाइम मॉनिटरिंग करून गाड्यांचे संचलन करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.

सीसीटीव्हीचा वॉच
- पश्चिम उपनगरातील मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे प्लॅटफॉर्म, स्थानकाखालील रस्ता आणि कॉन्कोर्सेस लेव्हल यांसारखी महत्त्वाची क्षेत्रे कव्हर करतात.
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नियंत्रण कक्ष विभाग आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास पाळत ठेवण्यात येत आहे.
- मेट्रो व्हायाडक्ट आणि डेपोच्या बॅलेस्टेड आणि बॅलेस्टलेस ट्रॅकवर सखोल तपासणी केली आहे.
- अग्निसुरक्षा यंत्रणा, मलनिस्सारण वाहिनी, पॉवर फेल्युअर प्रोटेक्शन सिस्टम अलर्ट मोडवर ठेवली आहे.
- आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याचे नियोजन केले आहे.


मुंबईत अतिवृष्टीत लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक ठप्प होते. त्यामुळे मुंबईकरांना उशिरा का होईना; पण सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी मोनो आणि मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ते ऑटो मोडवर सुरू होईल.
- महामुंबई मेट्रो
----------
नियंत्रण कक्ष
पूरस्थितीसारख्या आपत्तीदरम्यान रस्ते वाहतूक ठप्प झाल्यावर वाढीव प्रवासी संख्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी मेट्रो आणि मोनोच्या सेवांची वारंवारता वाढवण्याची तरतूद केली असून नियंत्रण कक्ष कार्यन्वित केला आहे.
- १८००८८९०५०५
- १८००८८९०८०८
- ८४५२९०५४३४ (मोनोरेल)
------------------------------

३) म्हाडा
धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर
म्हाडाने मुंबई शहरातील अतिधोकादायक जुन्या उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात २० इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारतींत ४९७ निवासी तर २१७ अनिवासी गाळे आहेत.

रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतर
- धोकादायक इमारतीतील संबंधित रहिवाशांची पर्यायी व्यवस्था म्हाडाकडून सुरू आहे. आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.
- ३६ निवासी भाडेकरूंनी स्वतःची निवासाची पर्यायी व्यवस्था केली आहे.
- उर्वरित इमारतींमधील भाडेकरूंना निष्कासनाच्या सूचना देण्यात आली आहे.
- ४१२ निवासी भाडेकरूंची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
---------------

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू, रहिवाशांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास जीवित व वित्तहानी टाळता येईल.
- मिलिंद शंभरकर, मुख्याधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
----------
नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात इमारत अपघात घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४ नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे.
- २३५३६९४५
- २३५१७४२३
- ९३२१६३७६९९
------------------------------
काय खबरदारी घ्यावी?
- उघड्या मॅनहोलपासून, नाल्यापासून जाताना सावधानता बाळगावी.
- पावसाळ्यात नागरिकांनी नाल्यात, गटारात कचरा टाकू नये.
- पाऊस सुरू असताना मोडकळीस आलेल्या इमारती, जुन्या वाढलेल्या झाडाच्या आडोशाला थांबणे टाळावे.
- रस्त्यावर पाणी भरले असेल तर पाण्यात गाडी घालू नये.
- उघड्या इलेक्ट्रिक केबल, वायर्सला हात लावू नयेत.
- हायटाईडदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे.
- पालिका, अग्निशमन दल, एमएमआरडीए, पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- पावसादरम्यान आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.
- शॉर्ट सर्किट किंवा आगीची घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्ष किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
- मद्यप्राशन करून पावसात वाहन चालवू नये.
---------------------------------
महापालिका रुग्णालय सज्ज
पावसाळा  सुरू झाला की, डास आणि जलजन्य आजारांनी त्रस्त लोकांची संख्या वाढू लागते.  डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि हिपॅटायटीसने लोक त्रस्त होतात.  अशा परिस्थितीत बाह्य रुग्ण विभाग तसेच रुग्णालयातील कक्षात रुग्णांची संख्या वाढते.  यावेळी पावसाळी आजारासाठी १,२०० खाटा आरक्षित केल्या आहेत.
- केईएम, सायन, नायर येथील प्रत्येक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात पावसाळ्यातील आजाराच्या रुग्णांसाठी ३० खाटा राखीव
- उपनगरात कांदिवली येथील भीमराव आंबेडकर रुग्णालयात ७० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत
- दोन आयसीयू, तीन प्रौढ व्हेंटिलेटर आणि दोन लहान मुलांचे व्हेंटिलेटरदेखील राखीव
- इतर उपनगरीय रुग्णालयांत ४० ते ५० खाटा राखीव ठेवल्या आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com