यंदाच्या पावसाळ्यात पालिकेची कसोटी

यंदाच्या पावसाळ्यात पालिकेची कसोटी

पालिका सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. जोरदार पर्जन्यवृष्टी आणि समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरती लक्षात घेता, यंदाचा पाऊस पालिका प्रशासनाची कसोटी ठरणार आहे. मुंबईतील नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी भरण्याची ठिकाणे याबाबत पालिकेने उपाययोजना केल्या आहेत. यंदा पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत जोरदार पाऊस झाला, तर मुंबई तुंबण्याचा धोका आहे; मात्र पालिकेने पावसाळ्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

नाल्यांतील गाळउपसा
पावसाळ्यापूर्वी लहान-मोठ्या नाल्‍यांतून एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यापैकी नऊ लाख ८५ हजार ०४८ मेट्रिक टन गाळ काढण्‍यात आला आहे. शहरी भागातील नाल्यांतून ९३.६७ टक्के, पूर्व उपनगरातील नाल्यांतून ८९.९० टक्के, पश्चिम उपनगरातील नाल्यातून ९१.८४ टक्के, मिठी नदीतून ९२.९० टक्के, तसेच लहान नाले आणि हायवेलगतच्या नाल्यांतून प्रत्येकी १०० टक्के गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे.

४३ हजार बसवल्या जाळ्या
मुंबईतील पर्जन्य जलवाहिनी आणि मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोल्सवर सुमारे ९४ हजार संरक्षक जाळ्या बसवणे आवश्यक आहे. २४ मेपर्यंत त्यापैकी फक्त ४३ हजार ५८१ संरक्षक जाळ्याच मॅनहोल्सवर बसवल्याची माहिती पुढे आली आहे. टेंडर प्रक्रियेला विलंब झाल्याने संरक्षक जाळ्या बसवण्यात मोठा अडथळा निर्माण झाल्याची चर्चा आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये मुसळधार पावसात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून जाताना उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने त्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पडून मृत्यू झाला होता. न्यायालयाने आदेश देऊनही पालिकेने मॅनहोल्स बंदिस्त केलेले नाहीत.

मिठी नदी गाळातच
मिठी नदीतून सुमारे दोन लाख ७० हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्‍ट आहे. त्यातील पावसाळ्यापूर्वी एकूण दोन लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्‍ट आहे. त्यामुळे मिठी अजूनही गाळातच असल्याचे दिसते.

रस्त्यांची दुरुस्ती
रस्ते वाहतूक योग्य करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना बजावले आहे. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी १० जूनपूर्वी पूर्ण करावीत, अशी तंबी कंत्राटदारांना पालिका प्रशासनाने दिली आहे.

समाजमाध्यमांद्वारे नोंदवता येणार तक्रार
दूरध्‍वनी, व्‍हॉटस्ॲप आणि समाजमाध्यमांद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रारी २४ तासांत निकाली निघतात किंवा नाही हे पाहण्यासाठी ‘इंटिग्रेटेड डॅशबोर्ड’ विकसित केला जात आहे. जेणेकरून तक्रार निकाली निघते किंवा नाही, किती वेळात निकाली निघते, प्रलंबित असेल तर कधीपासून प्रलंबित आहे, निकाली निघालेल्या तक्रारींबाबत तक्रारदाराचा ‘फीडबॅक’ काय आहे, तक्रार निकाली निघाल्याबद्दल तक्रारदार समाधानी आहे का? या गोष्टींची माहिती या डॅशबोर्डद्वारे कळू शकेल. ‘MyBMC Pothole FixIt’ या ॲपमध्ये वापरकर्तास्नेही बदल केले जात आहेत. मोबाईल क्रमांकाच्या आधारावर तक्रार सादर करता यावी, ई मेल आयडीची गरज नसावी, अशी पद्धती विकसित केली आहे.

तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांक
महापालिकेच्‍या अखत्‍यारितील रस्‍त्‍यांवरील खड्डेविषयक किंवा दुरुस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांविषयक तक्रार करावयाची असल्‍यास ती ‘१९१६’ या दूरध्‍वनी क्रमांकावर करता येईल. हा दूरध्‍वनी क्रमांक २४ तास कार्यरत असतो. बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या @mybmc या समाजमाध्यमांवरील ‘एक्स’ अकाऊंटला टॅग करूनही नागरिकांना खड्डेविषयक तक्रार नोंदवता येणार आहे.

४४२ पम्प तैनात
मुंबईत ९८ ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ४४२ पम्प बसवण्याची उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाने भरलेल्या पाण्याचा निचरा लवकर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून पावसाने पडलेल्या खड्ड्यांबाबत विभागवार उपाययोजना केल्या आहेत, रस्त्यात कुठेही खड्डा पडल्याची तक्रार आल्यास २४ तासांत तक्रारीची दखल घेत खड्डे बुजवले जातात. तसेच पाणी भरण्याच्या ठिकाणी पाण्याचा लवकर निचरा करण्यासाठीही उपाययोजना केल्या आहेत.
-भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका

नागरिकांचे स्थलांतर
तब्बल ३५ टक्के मुंबईकर पूरप्रवण क्षेत्राजवळ राहत असल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबईत जोरदार पावसात सखल भागात पाणी तुंबत असल्याने मुंबई ठप्प होते. त्यामुळे पालिकेकडून पावसात पाणी तुंबण्याची ठिकाणे शोधून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पूरप्रवण भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे. मुंबईतील पूरप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. मुंबईत सुमारे २,३०० मिमी पाऊस पडतो. यात अनेकदा कमी वेळात २०० ते ४०० मिमी पाऊस पडल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहराला पुराचा धोका संभवतो. अशावेळी पर्जन्य जलवाहिन्यांच्या रुंदीकरणाची कामे केली आहेत.

धोकादायक वृक्षांची छाटणी
सेंट पॉल रोड, वाकोला नदी, मोतीलाल नगर रोड, एमसी रोड, मरोळ भंडार, वांद्रे रेल्वे वसाहत यांसारख्या पूरप्रवण क्षेत्रातील पूर कमी करण्यासाठी बॉक्स ड्रेनचा वापर वाढवला आहे. विविध ठिकाणी बॉक्स नालेही बांधण्यात येत आहेत. मीलन सबवे, प्रमोद महाजन गार्डन-सेंट झेवियर गार्डन दादर या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या आहेत. नाल्यांच्या ठिकाणी असणाऱ्या झोपड्यांतील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. रस्त्यालगतच्या तसेच निवासी भागात धोकादायक वृक्षांची छाटणी केली आहे. दरडीलगत राहणाऱ्या रहिवाशांना संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com