कोकण पदवीधरसाठी ‘भाऊगर्दी’

कोकण पदवीधरसाठी ‘भाऊगर्दी’

कोकण पदवीधरसाठी ‘भाऊगर्दी’
- महायुती, महाविकास आघाडीत फाटाफूट
- अपक्षांसह २६ उमेदवार रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची भाऊगर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक एकदिलाने लढलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीची पदवीधर निवडणुकीत फाटाफूट झाली आहे. प्रत्येक पक्ष व गटाने स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सर्वात आधी दावा ठोकणाऱ्या मनसेने आयत्यावेळी माघार घेतली असली, तरी भाजप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस अशा प्रमुख पक्ष व गटांचे उमेदवार यांच्यासह २१ अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर संजय मोरे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे; मात्र माघारीनंतर नेमके किती शिलेदार कोकण सर करण्यासाठी रिंगणात राहणार, हे स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असून आता विधान परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. २६ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते. या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी अशी लढत होणार नाही, तर प्रत्येक पक्ष व गट स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला; तर त्यांच्यासमोर महायुती घटक पक्षाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर संजय मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित सरैया, काँग्रेसचे स्थानिक नेते रमेश कीर, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन यांचे प्रमुख आव्हान आहे. याशिवाय समाजसेवक नागेश निमकर, कोचिंग क्लासेस संघटनेचे अमोल जगताप आणि गेल्या २९ वर्षांपासून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय असलेले गोकुळ पाटील यांच्यासह २१ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

डावखरे हॅट्ट्रिकच्या तयारीत
निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लढवत आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांनी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतून पहिल्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश घेत उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवून शिवसेना उमेदवार संजय मोरे यांचा पराभव केला होता. त्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीम मुल्ला यांनीही निवडणूक लढवली होती. यंदा ही निवडणूक सोपी व्हावी, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत अभिजित पानसे यांचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे आता पानसे निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. तसेच मनसेचा पाठिंबा मिळाल्याने ते आता विजयाची हॅट्ट्रिक साधणार का, हे आता पाहावे लागेल.

शिवसेना शिंदे गटाचे मोरे अपक्ष उमेदवार
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असूनही महायुती धर्म म्हणून शिवसेनेकडून त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याचे समजते. असे असले तरी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत निरंजन डावखरे आणि संजय मोरे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. यात डावखरे यांचे डाव खरे पडले आणि मोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या ताकदीमुळे ठाण्यातून एक माजी महापौर खासदार झाला. याच ‘बळावर ’आणखी एक माजी महापौर विधान परिषदेवर जाणारच, असा विश्वास उमेदाराकडून व्यक्त केला जात आहे; मात्र ठाकरे गटाचे किशोर जैन हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे दोन्ही शिवसेना एकमेकांना भिडल्या, तशीच परिस्थिती कोकण पदवीधरमध्येही निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजप उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेसचे आव्हान
लोकसभा निवडणुकीत ठाणेसह कोकण विभागाच्या एकूण कामगिरीचा विचार केला असता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची कामगिरी सुमार असल्याचे पाहायला मिळाली. विशेषत: काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सक्रिय नसल्याचे दिसून आले. याचा फटका शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना बसला होता. मुळात ठाण्यासह कोकणातून काँग्रेसची ताकद कमकुवत झाल्याचे म्हटले जाते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही काँग्रेसने रमेश कीर यांना उमेदवारी देत आव्हान स्वीकारले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने चांगली कामगिरी करत भिवंडीतून खासदार निवडून आणला. त्या जोरावर आता माजी नगरसेवक अमित सरैया यांना उमेदवारी देण्यात आली आहे; पण ते हे आव्हान कितपत पेलतात, हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com