मलबार हिल जलाशय न तोडताच दुरुस्ती

मलबार हिल जलाशय न तोडताच दुरुस्ती

मलबार हिल जलाशय न तोडताच दुरुस्ती
जलाशय नव्याने बांधण्याचे टेंडर रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मलबार हिल येथील जलाशय नव्याने बांधण्याचे टेंडर आता पालिकेकडून रद्द केले जाणार आहे. तज्ज्ञ समितीने हा जलाशय केवळ दुरुस्तीने सुस्थितीत येऊ शकतो, असा अहवाल दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जलाशय न तोडता व झाडांची कत्तल न करता या जलाशयाची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ब्रिटिशकालीन १३६ वर्षे जुना असलेल्या मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. मुंबई शहरात मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्त्वाची जागा आहे. हा जलाशय नव्याने बांधायचा झाल्यास येथील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करावी लागणार आहे. शिवाय येथील मोकळ्या जागेलाही फटका बसणार होता. येथील नागरिकांकडून याला विरोध करण्यात आला. येथे नव्याने जलाशय बांधू नये, असा विरोध नागरिकांचा होता. जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ७०० कोटींचा खर्च का, असा सवालही मलबार हिल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जलाशय नव्याने बांधल्यास हँगिंग गार्डनलाही फटका बसणार होता. दरम्यान, नव्याने जलाशय बांधण्यास होणाऱ्या विरोधामुळे टेंडर रद्द करावे, याबाबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणींसोबत बैठकही पार पडली. मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करताना झाडे, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देशही लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
...............
दक्षिण मुंबईची तहान भागणार
दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन या जलाशयाची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पुनर्बांधणीनंतर सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना होती. ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशय तब्बल १३६ वर्षे जुना आहे. सध्याच्या फिरोजशहा मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली १८८७ मध्ये बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोडमधील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com