पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज

पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज

पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज
२९२ पाणी उपसा पम्प कार्यरत; नाल्‍यांवर लोखंडी जाळ्या
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः पावसाळ्यात रेल्वेची लोकल वाहतूक अखंडपणे सुरू राहावी, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने ट्रॅकमधील नालेसफाई, कल्‍व्हर्टची स्वच्छता, झाडांची छाटणी अशी कामे केली आहेत. तसेच पाणी भरणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी तब्बल २९२ उच्च क्षमतेचे पम्प बसवण्यात आले आहेत. स्थानकातील नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्‍यामुळे कचरा रोखण्यासाठी नाल्यांवर लोखंडी जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे.
उपनगरीय विभागांवरील ९२ कल्‍व्हर्ट स्वच्छ केले आहेत आणि सध्या आणखी ६४ कल्‍व्हर्टच्या साफसफाईचे काम प्रगतिपथावर आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार-एलटीटी परिसर, टिळकनगर या भागात आरसीसी ब्लॉक्स बसवून कल्व्हर्ट विस्ताराचे काम करण्यात येत आहे.
ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येणाऱ्या सहा हजार झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुळांलगत असलेले सिग्नल मोटर, पॉईंट अशी विद्युत उपकरणे सज्ज करण्यात आली आहेत.
ग्रॅंट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव, मालाड, बोरिवली, विरार आणि वैतरणा या भागात जास्त प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे आठ ठिकाणी छोटे बोगदे बनवून अतिरिक्त जलमार्ग तयार करण्यात आले.
साचणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी मध्य रेल्वेवर यंदा विक्रोळी-कांजूरमार्ग, कांजूरमार्ग आणि शीव स्थानक परिसरात तीन नवे मायक्रोटनलिंग उभारण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा मध्य रेल्वेवरील ११ ठिकाणी मायक्रोटनलिंगच्या मदतीने वेगाने पाण्याचा निचरा होणे शक्य होणार आहे.

इथे लागले पम्प
मध्य रेल्वेने २४ ठिकाणी १९२ पम्प बसवले आहेत. यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर, गुरू तेगबहादूर (जीटीबी) नगरचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यान दादर, अंधेरी, बोरिवली आणि भाईंदर स्थानक परिसरात एकूण १०० पम्प कार्यान्वित केले आहेत.

११९ किमी नालेसफाई
रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील ११९.८२ किमी नालेसफाईपैकी ६८.४४ किमीची नालेसफाई पूर्ण केली आहे. उर्वरित ५१.३८ किमी नालेसफाईचे काम सुरू आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील ५० किमीच्या नाल्यांपैकी ३८ किमी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाई लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

उद्धोषणेद्वारे गर्दीचे व्यवस्थापन
रेल्वे ट्रॅकमध्ये पावसाचे पाणी भरल्यास लोकल सेवा ठप्प होते. त्यामुळे या कालावधीत उद्घोषणेद्वारे गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच गर्दीवर सीसीटीव्हीद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे स्टॉलवर खाद्यपदार्थांच्या वस्तू जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत.

नियंत्रण कक्षात हॉटलाईन
पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यावर देखरेख नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, राज्य सरकार, मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याकरिता नियंत्रण कक्षात हॉटलाईन सुरू करण्यात आली आहे.

ड्रोन सर्वेक्षण-
कल्‍व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, साफसफाई आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. बोरिवली-विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल.

३६ पूरमापक यंत्रे
संवेदनशील पुलांची वास्तविक वेळ आणि अस्सल पाणी पातळीची माहिती देण्यासाठी चार जलपातळी निरीक्षण उपकरणे स्थापित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, ३६ ठिकाणी पूरमापक प्रदान करण्यात आले आहेत.


कोट -
आगामी पावसाळ्यात लोकल सेवा व लांब पल्ल्याच्या गाड्या सुरळीत चालाव्यात, यासाठी रेल्वेने कल्‍व्हर्ट आणि नाल्यांची साफसफाई, गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण आणि कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पम्पांची तरतूद केली आहे. तसेच झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे पूर्ण केली आहेत. रेल्वे प्रशासन इतर सर्व विभागांबरोबर समन्वयाने सर्व सेवा सुरळीत चालतील, याचा प्रयत्न करणार आहे.
-डॉ. स्वप्नील निला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com