शिक्षण हक्क आरक्षित जागांसाठी १० हजार अर्ज

शिक्षण हक्क आरक्षित जागांसाठी १० हजार अर्ज

‘आरटीई’च्या जागांसाठी १० हजार अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. २५ टक्के आरक्षित जागांसाठी, म्हणजे सव्वासहा हजार जागांसाठी तब्बल ९ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत शुक्रवारी (ता. ७) पुणे येथे ऑनलाईन सोडत काढण्यात आली असून बुधवारी, १२ जूनला आरक्षित जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ७ जूनला सकाळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे काढण्यात आली. या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी येत्या १२ जूनला उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार जाहीर करण्यात येणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ व शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे.

..
पालिका हद्दीतील ३३८ शाळा पात्र
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सुधारित ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १७ ते ३१ मे पर्यंत कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदतवाढ ४ जूनपर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार पालिका क्षेत्रातील एकूण ३३८ पात्र शाळांमध्ये एकूण ६ हजार २६५ जागांवर एकूण ९ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com