''आज्जी बाई जोरात'' मध्ये बच्चे कंपनीची धमाल

''आज्जी बाई जोरात'' मध्ये बच्चे कंपनीची धमाल

‘आज्जी बाई जोरात’मध्ये बच्चेकंपनीची धमाल
रसिकांनी ओसंडून वाहिले नाट्यगृह; मुलांनी नाचून केला व्यक्त आनंद

मुंबई, ता. ८ : मोबाईलमध्ये अडकून पडलेल्या लहान मुलांना त्यातून बाहेर काढून, त्यांना मराठी अक्षरओळख, मराठी खेळ आणि मराठी भाषा; तसेच मराठी मातीतील जगणे शिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी गोष्टींमधून अत्यंत प्रभावीपणे मांडणी करणाऱ्या ''आज्जी बाई जोरात'' नाटकाला बच्चेकंपनीने अत्यंत धमाल करत आपला प्रतिसाद नोंदवला. नाट्यगृहामध्ये मिळेल त्या जागेवर नाचून आनंद व्यक्त केला.
केवळ अक्षर ओळखच नाही, तर मराठीतील शब्दांची उत्तरे देत नाटकाला उपस्थित असलेल्या बच्चेकंपनीने नाटकातही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाटकाचा एक भाग झाल्याचे चित्र या नाट्यगृहात पाहायला मिळाले. मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह नाट्यरसिक बच्चेकंपनीमुळे ओसंडून निघाले होते. या वेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोठी गर्दी केले होती.

सकाळ समूह आयोजित चंद्रकांत कुलकर्णी नाट्यमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांच्या ''आज्जी बाई जोरात'' या नाटकांची मेजवानी होती. या नाटकात पुष्कर श्रोत्री, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर आणि मुग्धा गोडबोले यांनी आपल्या धमाल अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

भारतीय नाट्यक्षेत्रात पहिल्यांदा एआयचा वापर करून या नाटकाची निर्मिती केली आहे. मराठीतील अशा एआयवरील आधारित पहिले बालनाट्य म्हणून वेगळ्या प्रकारची नोंद या नाटकाने अधोरेखित केली आहे. नाटकाची सुरुवात, एआयचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डमी आवाजावरून झाली.
एआयवरील आधारित पहिले बालनाट्य असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मुलांच्या हातातून अलगद मोबाईल काढून हातात पुस्तक द्यायचे आणि शाळेत नव्हे तर बालपणात पाठवाचे आहे, असा संदेश देत यातील आजीचे पात्र करणाऱ्या निर्मिती सावंत यांनी या नाटकाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्या संदेशाप्रमाणेच अक्षराच्या गावात, गावाबाहेरची रडकी भिंत, स्वर सुटका, टिंबकबड्डी स्पर्धा, गोष्टीच्या माध्यमातून मध्यंतरापर्यंत मोबाईल गेम आणि एकूणच त्या तंत्रात अडकलेल्या अक्षर कदम ऊर्फ अक्कू याला बाहेर काढून मराठी अक्षरओळख करण्यापासून ते विविध प्रकारचे खेळ आणि मातीतील गोडवा त्याच्या अंगी आणण्याची किमया केली.
त्यानंतर अक्कू आपल्या आईच्या म्हणण्यानुसार शाळेत गेला. मराठीच्या पाट्या वाचायला लागला. त्यानंतर पुन्हा त्याच्यासमोर विविध मोबाईल गेममध्ये सतावत असलेल्या खलनायकाची एन्ट्री होते आणि तिथून त्याचा नवा संघर्ष होतो. गेममधील नवीन अपडेट याची माहिती देणाऱ्या मित्राच्या सोबतीने तो गेमच्या म्हणजेच गेमाडच्या जाळ्यात अडकतो. आपल्याला मिळालेल्या कुऱ्हाडी गमावतो. गेममधील अनेक खलनायक त्याच्यासमोर उभे असतात. त्याला संपवण्यासाठी पुन्हा आजी बाई मदतीला येते आणि तिथून बाहेर निघण्यासाठी प्रवास सुरू होतो. खलनायकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मराठीतील गोष्टी कामी येतात. ज्ञानेश्वरीमधील ओव्या त्याला कामी येतात. छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी मावळ्यांनी दिलेल्या घोषणा देतो. अनेक युक्त्या करत त्यातून तो पुन्हा मराठीच्या ओढीने येतो आणि मोबाईलमध्ये असलेल्या त्या गेमाडला संपवून मोबाईलमधून पुस्तक, शाळा, भाषा याच्या ओढीला लागतो. यादरम्यान, नाटक संपल्यानंतर या नाटकाला आलेल्या प्रत्येक मुलांना एक प्रशस्तीपत्र आणि नवनीतकडून एक वही देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com