भातबियाण्यांवर प्रक्रिया करूनच पेरणी करा

भातबियाण्यांवर प्रक्रिया करूनच पेरणी करा

वाणगाव, ता. ९ (बातमीदार) : खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी शेतकरी करत आहेत. तर काही शेतकरी मागील वर्षीचे भातबियाणे पेरणीसाठी वापरत आहेत. मात्र, या बियाण्यांवर कोणतीही बीज प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे बियाण्यांची उगवण योग्य रीतीने होत नाही. अशा बियाण्यांवर पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; अन्यथा उत्पादनात मोठी घट येऊ शकते, असे तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहेे.
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांद्वारे होत असतो. बियाणे पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. तसेच बियाण्यांची शेतातील उगवण वाढवणे आणि रोपे जोमाने येण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया बियाण्यांवर करणे आवश्यक आहे. या सर्वांबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे बियाणे आणि जमिनीद्वारे उद्‍भवणाऱ्या कीड व रोगांपासून पिकांची मुक्तता व्हावी आणि उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने गावोगावी शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी कृषी विभाग बीजप्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिके दाखवत आहेत, असे तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते यांनी सांगितले.

भातबियाण्यांची बीजप्रक्रिया
१) मिठाचे पाणी : या बीजप्रक्रियेमध्ये १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून घ्यावे आणि त्यामध्ये भातबियाणे ओतून चांगले ढवळून घ्यावे. त्यानंतर द्रावण स्थिर होऊन द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे. सावलीत २४ तास वाळवावे आणि त्यानंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

२) बुरशीनाशक प्रक्रिया : बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्यात राहणाऱ्या आणि उगवल्यानंतर पिकास अपायकारक असणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी बीजप्रक्रिया करतात. यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बनडिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

३) जीवाणू संवर्धक : बियाणे रुजल्यापासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध व्हावे, म्हणून जीवाणू खताची बीजप्रक्रिया केली जाते.
* पीएसबी (स्फुरद विरघळणारे जीवाणू) हे जीवाणू जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या पिकास उपलब्ध करून देतात. याचे वापराचे प्रमाण २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे.
* ऑझटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. त्यानंतर ते नत्र जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात. वापराचे प्रमाण २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे.

बीज प्रक्रियेचे फायदे :
१) जमिन आणि बियाण्यांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
२) बियाण्यांची शेतात उगवण्याची क्षमता वाढते.
३) रोपांची निरोगी व जोमदार वाढ होते.
४) बियाण्यांभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते आणि रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते.
५) रोग व कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते.
६) नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते.
७) पीक एकसारखे वाढते. मशागतीचा खर्च कमी येतो.
८) बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.

----
शुद्ध व सशक्त बियाणे पेरणीसाठी वापरल्याने रोपे जोमदार येतात आणि जमीन, बियाण्यांतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. जीवाणू संवर्धकमुळे नत्र व स्पुरद उपलब्धता झाल्याने पिकात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे. तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया, थायरम या रासायनिक औषधाची; तसेच पीएसबी व अझोटोबॅक्टर या जैविक संवर्धकांचा वापर भातबियाण्यांवरील बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी करावा.
- रवींद्र पाचपुते, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com