डोंबिवलीत झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

डोंबिवलीत झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रोडवर सोमवारी (ता. १०) दुपारी १२ च्या सुमारास अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. पाऊस, वारा नसताना जुने मोठे झाड अचानक पडल्याने पादचारी, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावरच झाड पडल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
फडके रोडवरील जुने गुलमोहराचे झाड सोमवारी दुपारी कोसळले. भर दुपारी झाड अचानक कोसळल्याने काही काळ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केलेली असतात. फेरीवाले बसलेले असतात. पादचारी, वाहनांची सातत्याने रहदारी असते. यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. मात्र पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी झाली आहे का? जीर्ण वृक्षांची पडझड पाऊस नसताना होत असेल, तर सोसाट्याच्या वाऱ्यांत पावसाळ्यात परिस्थिती काय असेल? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. झाड कोसळल्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने मदन ठाकरे चौक, एचडीएफसी बँक रस्त्यावरून नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे चालकांना न्यावी लागली. अरूंद नेहरू रस्त्यावर एकावेळी रिक्षा, खासगी वाहने आल्याने या रस्त्यावर कोंडी झाली. अग्निशमन विभागाचे पथकाने झाडाच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, झाडांच्या फांद्यांचा पसारा रस्त्यावर पसरल्याने पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com