गृहप्रकल्पाचे काम लटकवलेल्या विकसकांना महारेराचा दणका

गृहप्रकल्पाचे काम लटकवलेल्या विकसकांना महारेराचा दणका

गृहप्रकल्पाचे काम लटकवलेल्या विकसकांना महारेराचा दणका
- १,७५० प्रकल्पांची नोंदणी रद्द, एमएमआर क्षेत्रातील ७६१ प्रकल्पांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करता लटकवून ठेवणाऱ्या विकसकांना महारेराने जोरदार दणका दिला आहे. प्रकल्प ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणे, झालेल्या विलंबाबाबत रेरा प्राधिकरणाला माहिती न देणे, परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू न केल्याचा ठपका ठेवत तब्बल १,७५० प्रकल्पांची नोंदणी रद्द केली आहे. तर १,१३७ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये मुंबई शहर, उपनगरसह एमएमआर क्षेत्रातील ७६१ प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित विकसकांचे धाबे दणाणले आहेत.
सर्वसामान्य घर खरेदीदारांना वेळेत घराचा ताबा मिळावा, विकसकांच्या मनमानीला चाप लागावा, म्हणून महारेराने प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दर तीन महिन्याला प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल रेरा प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेराकडे नोंदणी केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन ग्राहकांना ठरलेल्या मुदतीत घराचा ताबा मिळण्यास मदत होत आहे; पण अनेक विकसकांनी अनेक महिने प्रकल्प लटकवून ठेवले असून त्याची कारणेही रेराकडे सादर केली नाहीत. न प्रकल्पाला मुदतवाढ मिळावी, म्हणून प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी या प्रकल्पांत गुंतवणूक करताना काळजी घ्यावी, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले असून या प्रकल्पांची यादी रेराच्या संकेतस्थळावर टाकली आहे.
-----------
नोंदणी रद्द केलेले प्रकल्प
मुंबई शहर- ४८
मुंबई उपनगर- ११५
ठाणे- १८२
पालघर- ९९
रायगड- २१६
रत्नागिरी- ७७
सिंधुदुर्ग- २३
पुणे- ६२८
उत्तर महाराष्ट्र- १३५
विदर्भ- ११०
मराठवाडा- १००
दादरा नगर हवेली- १३
दमण- ३
--------
बँक खाते सील
महारेरा नोंदणी रद्द केलेल्या प्रकल्पांचे बँक खाते सील केले जाते. तसेच संबंधित प्रकल्पाची जाहिरात, पणन त्यातील सदनिकांची विक्री, नोंदणी करता येत नाही. त्यावर रेरा पदाधिकरणाकडून बंदी घातली जाते.

सहा हजार ६३८ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस
राज्यातील एकूण प्रकल्पांचा आढावा घेऊन अशा प्रकारच्या लटकलेल्या सहा हजार ६३८ प्रकल्पांना ३० दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यापैकी तीन हजार ७५१ प्रकल्पांतील काहींनी प्रकल्प पूर्णतेचा प्रपत्र चार महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत केले, काहींनी महारेरा नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज केले, तर काहींनी प्रकल्पात नोंदणीपासूनच काही हालचाल नसल्याने प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केले. उरलेल्या २,२८७ प्रकल्पांपैकी १,५७० प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
------------
म्हाडाच्या तीन प्रकल्पांचा समावेश
महारेराने नोंदणी रद्द केलेल्या गृह प्रकल्पात म्हाडाच्या सिद्धार्थनगर गोरेगाव, कोपरी पोवई, टागोरनगर विक्रोळी ता तीन प्रकल्पांचा समावेश आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
------------
कोट -
घरखरेदीत गुंतवणूक करणारा कुठलाही ग्राहक, कुठल्याही प्रकारे फसवला जाऊ नये, यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रकल्प सुरू होण्यापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या विकसकाला प्रकल्पाची जी आणि जेवढी माहिती उपलब्ध असते ती सर्व माहिती घर खरेदीदारालाही असायला हवी, यासाठीच महारेरा विविध विनियामक तरतुदींच्या आधारे, विविध पातळ्यांवर या क्षेत्राचे सूक्ष्म संनियंत्रण करीत आहे.
- अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com