दलित मतदारांना गृहीत धरल्याचा ‘वंचित’ला फटका

दलित मतदारांना गृहीत धरल्याचा ‘वंचित’ला फटका

दलित मतदारांना गृहीत धरल्याचा ‘वंचित’ला फटका

अनिल साबळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या कामगिरीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. निवडणुकांपूर्वी ‘वंचित’ची ‘मविआ’मध्ये सामील न होण्याची भूमिका ही भाजपला पोषक ठरण्यासोबत भाजपच्या विरोधी मतांमध्ये फूट पाडेल, अशी भीती काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना होती. मात्र ही भीती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फोल ठरली. यामध्ये केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आणि दलित मतदारांना गृहीत धरून निवडणुका लढवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना याचा फटका बसल्याचे दिसून आले.


‘वंचित’ने राज्यातील लढवलेल्या सर्व जागांवर त्यांचा पराभव झाला. ‘वंचित’ने राज्यभरात आपले ३८ उमेदवार उभे केले; तर सात ठिकाणी इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. यामध्ये अनेक उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. काही मतदारसंघांमध्ये ‘वंचित’चे उमेदवार हे तिसऱ्या, चौथ्या स्थानावर राहिले. अनेक उमेदवारांना पाच ते दहा हजारांचा टप्पाही ओलांडता आला नाही. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात होते. २,७६,७४७ मते मिळवत ते तिसऱ्या स्थानावर राहिले. याठिकाणी खरी लढतही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात झाली. शिर्डी लोकसभेसाठी उत्कर्षा रुपवते रिंगणात होत्या. या ठिकाणी शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे अशी लढत झाली. या लढतीत रुपवते तिसऱ्या स्थानावर राहिल्या. पुण्यामध्ये वसंत मोरे हे मोठी लढत देण्याची शक्यता होती, मात्र याही ठिकाणी भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत झाली. मोरे यांना ३०, ०१२ मते मिळाली. हिंगोलीत तिसऱ्या स्थानावरील बी. डी. चव्हाण १,६१,८१४ मते मिळाली. हे काही अपवाद वगळता ‘वंचित’च्या इतर उमेदवारांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

लोकसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ‘वंचित’ने स्वबळाचा नारा दिला. यावेळी भाजपने ४०० पारचा नारा दिल्याने विरोधकांनी एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली. भाजपला ४०० पेक्षा जास्त खासदार हे संविधान बदलण्यासाठी हवे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा प्रचार अनेक ठिकाणी परिणामकारक दिसून आला. त्यामुळे काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीने ‘संविधान बचाव’ ही मोहीम राष्ट्रव्यापी बनवली. या मोहिमेला बगल दिल्याचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला. याच दरम्यान राज्यातील अनुसूचित घटकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका कायम केली.

..
औरंगाबादमध्ये फटका
औरंगाबादमध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ व ‘एमआयएम’ युतीचे इम्तियाज जलील निवडून आले होते. यंदा जलील यांच्यासमोर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि ‘वंचित’चे अफसर खान रिंगणात होते. मात्र या ठिकाणी भुमरे आणि इम्तियाज यांच्यात खरी लढत झाली. यावेळी अफसर खान यांनी ६९,२६६ मते मिळवली. या ठिकाणी ‘एमआयएम’ला सोबत न घेतल्याचा फटका ‘वंचित’ला बसला.


..
व्होट शेअरमध्ये घट
२०१९ ची लोकसभा निवडणूक ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’च्या युतीने लढवली. तेव्हा त्यांनी राज्यातील सर्व ४८ जागा लढवल्या होत्या. यामध्ये ‘वंचित’ने लढलेल्या ४७ लोकसभा मतदारसंघात मिळवलेल्या मतांची एकूण संख्या ४१ लाख ३२ हजार ४४६ इतकी होती. या निवडणुकीत ‘वंचित’चा व्होट शेअर हा ६.९२ टक्के इतका होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने १५ लाख ९५ हजार ४०१ इतकी मते मिळवली. यावेळी ‘वंचित’चा व्होट शेअर हा ३.६७ टक्क्यांवर घसरला. २०१९ च्या विधानसभा ‘वंचित’चा व्होट शेअर हा ४.५८ टक्के इतका होता.

..
अनियमित राजकारण
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण हे अनियमित आहे. निवडणुका ते निवडणुका असे त्यांचे राजकारण असते. निवडणुका जिंकण्यासाठी पूर्णवेळ राजकारण हवे. सोबतच संघटनात्मक पातळीवर वंचित आघाडी कमकुवत आहे. वंचितमध्ये कार्यकर्त्यांची कोणतीही फळी दिसत नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करू आणि भविष्यात पक्ष मजबुतीसाठी काम करू, अशी प्रतिक्रिया ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com