प्रीमियर पुरस्कारासाठी रंगणार सरस चित्रपटांमध्ये चुरस!

प्रीमियर पुरस्कारासाठी रंगणार सरस चित्रपटांमध्ये चुरस!

प्रीमियर पुरस्कारासाठी रंगणार
सरस चित्रपटांमध्ये चुरस!

ठाण्यात उद्या मान्यवरांच्या साक्षीने गौरवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १० : ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळ्याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली असून ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘नाळ २’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटांमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी चुरस लागली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनत असून त्याच पठडीतील हे तिन्ही चित्रपट आहेत. त्यामुळेच सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक कोण ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिग्दर्शक आशीष बेंडे यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’, दिग्दर्शक सुधाकर यक्कंटी यांचा ‘नाळ २’ आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवरही त्यांनी उत्तम कामगिरी केली असून समीक्षकांनीही त्यांचे कौतुक केले. आता तिघांपैकी कोणता चित्रपट बाजी मारतो, याचा उलगडा बुधवारी (ता. १२) होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात होणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार’ सोहळा रंगणार आहे. पीएनजी ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. मनोरंजनसृष्टीबरोबरच सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. खुसखुशीत विनोदाच्या जोडीला नृत्याचा अप्रतिम आविष्कार अशी मनोरंजनाची खास मेजवानीही सादर होणार आहे. सर्व रसिकांना हा सोहळा विनामूल्य अनुभवता येणार आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बालवयीन मुलाच्या पहिल्या प्रेमाची कथा त्यात दाखवण्यात आली होती. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, खुशी हजारे, मानस तोंडवळकर, चेतन वाघ, रुमणी खरे आणि केतकी सराफ यांच्या भूमिका चित्रपटात होत्या. सगळ्याच कलाकारांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. झी स्टुडिओज, कलर येलो प्रॉडक्शन्स, टी सीरिज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

सुधाकर यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळला. त्यातील कलाकारांचेही प्रचंड कौतुक झाले. श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांनी त्याची निर्मिती केली होती.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यातीलच एक ‘महाराष्ट्र शाहीर’. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अंकुश चौधरी याने त्यांची भूमिका साकारली होती. सना शिंदे व अश्विनी महांगडे याही महत्त्वपूर्ण भूमिकेत होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. प्रेक्षक-समीक्षकांनीदेखील त्याचे भरभरून कौतुक केले.

ध्यास उत्कृष्टतेचा
सर्वोत्तम चित्रपटासोबतच सर्वाधिक उत्सुकता असते ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची. त्यासाठी अंकुश चौधरी, शशांक शेंडे आणि अजय पूरकर यांच्यात स्पर्धा होणार आहे. मधुरा वेलणकर, निर्मिती सावंत आणि शिल्पा नवलकर यांची नावे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या पुरस्कारांच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी आशीष बेंडे, केदार शिंदे आणि सुधाकर यक्कंटी यांची नावे आघाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com