आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीची कोंडी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीची कोंडी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीची कोंडी
कोपर स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१० : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लोकल विलंबाचा फटका बसला. मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने २० मिनिटे दोन लोकल खोळंबल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक सोमवारी कोलमडले.

मुंबईत मॉन्सूनचे आगमन झाले असून रविवारी (ता.९) मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी दिली आहे. सोमवारी (ता.१०) काही ठिकाणी पाऊस झाला. त्यातच अगोदरच लोकल सेवा धीम्यागतीने सुरू असताना कोपर रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी ३.५८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाडाची घटना घडली. त्यामुळे एकामागेएक लोकल खोळंबल्या. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेत २० मिनिटांत लोकल सेवा पूर्ववत केली, मात्र या बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

..
हार्बर मार्गावरील लोकल सेवा विलंबाने
सीएसएमटी यार्डमध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसविण्यात आली, परंतु नवीन सिग्नल यंत्रणा स्थिर न झाल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून भायखळा ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा कासवगतीने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यातच हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सोमवारी १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहे. हार्बर मार्गावरील विलंबाचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. यामुळे प्रवाशांना सोमवारी गर्दीचा सामना करावा लागला.


..
वाहनांच्या बिघाडामुळे वाहतूक मंदावली
आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाहनांत झालेल्या बिघाडामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे वांद्रे-वरळी सी लिंक, बीकेसी रोड, पूर्व मुक्त मार्ग आणि ईस्टर्न फ्री वे वरील वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांचे हाल झाले. ठिकठिकाणी वाहने बंद पडल्याने अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना २० ते २५ मिनिटे लागत होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. यामध्ये वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने नादुरुस्त वाहने बाजूला करत येथील वाहतूक सुरळीत केली. वडाळा फ्रीवेवर दक्षिणेकडे पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com