मतदार यादी ते मतमोजणी प्रवास सुकर

मतदार यादी ते मतमोजणी प्रवास सुकर

मतदार यादी ते मतमोजणी प्रवास सुकर
मुंबईत निवडणूक कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या मेहनतीला यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. रविवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडला. लोकशाहीचा हा उत्सव पार पाडण्यात निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईसारख्या शहरात हे आव्हान कठीण होते. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचा परिणाम मतदान टक्केवारी वाढण्यात झाला. अनेक आरोप- प्रत्यारोपाच्या सावटात मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदान झाले. काही आक्षेप वगळता मतमोजणीही शांततेत पार पडली.
मुंबईतील निवडणूक मे महिना सुट्टीचा आणि निसर्गतः मोठे आव्हान होते. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न केला होता. त्यामध्ये १८ ते १९ वयोगटातील जवळपास २ लाख ६ हजार ४५० एवढी नवमतदार नाव नोंदणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन ते तीन महिने आधीपासून नाव नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येत होती. वीज बिलावरती क्यूआर कोड आणि लिंक पाठविण्यात येत होते. स्वीप उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र एका ठिकाणी आहे अशा १,०७३ ठिकाणी बूथ लेवल प्लॅन तयार केला, असे मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. यादव यांच्याकडे मुंबई शहरात दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी होती.
मुंबई शहरात मतदानावेळी मशीन बंद पडले, बोगस मतदान, मोठा तांत्रिक बिघाड अशा तक्रारी कुठे आल्या नाहीत. पिण्याचे पाणी, टॉयलेट अशा आवश्यक त्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेड देखील लावण्यात आले होते. काही ठिकाणी कमतरता पडल्याच्या तक्रारी होत्या, मात्र आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या सर्व उणिवा भरून काढण्यात येतील, असे यादव यांनी सांगितले.
दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक यांना गृहमतदान, तर मतदानाच्या दिवशी वाहतूक व्यवस्था केली. काही विशेष गाड्यांमध्ये व्हीलचेअर होत्या. मार्गदर्शनासाठी मदतीस नेमले. मतदान केंद्र ते घर प्रवास सुकर केला. जनजागृती मोठ्या प्रमाणात केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


मतदान ते मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी अतियश व्यवस्थित जबाबदारी पार पडली.
संजय यादव,
जिल्हाधिकारी, मुंबई शहर

वेगवेगळ्या विभागातून आलेले अधिकारी कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे, उत्साहाने काम करत होते. मतदान वाढवण्यासाठी मल्टीमीडियाचा प्रभावी वापर केला. आमचा माध्यम कक्ष चार महिने अखंडित २४ तास ॲलर्ट मोडवर होता. हा सर्व अनुभव खरंच एक शिकविणारा आणि प्रेरित करणारा होता.
काशीबाई थोरात,
माध्यम समन्वयक अधिकारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण चार लोकसभा मतदारसंघांचे नियोजन करण्यात आले. मतदान केंद्र सापडण्यापासून अडचणी सुरू होतात, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. या अडचणींवर मात करण्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर आपले मतदान होणार आहे, ते समजण्यासाठी रंगसंगतीचा वापर करण्यात आला.
ऊन जास्त असल्याने प्रत्येक मतदान केंद्रासमोर मंडप टाकण्यात आला. बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. एकीकडे कडक ऊन,  उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सलग तीन सुट्ट्यांमुळे नागरिक मुंबईबाहेर जाणार  हे पाहता मतदानाचा टक्का खालावण्याची शक्यता होती, परंतु अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन मतदानाची टक्केवारी राखण्यात यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांपासून  मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी खूप मेहनत घेतली. मतदार यादी अद्ययावत करण्यात आली, तसेच मतदानाच्या दिवशी एका घरी दोन भेटी देण्यात आल्या. त्यामुळे यावेळी मतदान चांगले झाले. 
राजेंद्र क्षीरसागर
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर 

मतदान जनजागृतीसाठी प्रत्‍येक भागामध्ये डीएलओ, आशा वर्कर यांनी मोठा सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिक,  दिव्यांगांचे सुकर मतदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. वरिष्ठांचे योग्य नियोजन आणि सर्व सहकाऱ्यांची मेहनत यामुळे मतदान चांगले होऊ शकले.        
प्रिया वाघ, तहसीलदार, घाटकोपर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com