ज्यादा व्याजदराच्या प्रलोभनातून गंडा

ज्यादा व्याजदराच्या प्रलोभनातून गंडा

पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : कळंबोलीतील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीची मुदत ठेवीवर जास्त व्याजदर देण्याच्या बहाण्याने तब्बल ५४ कोटी २८ लाखांची रक्कम हडपण्यात आली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश व पोलाद बाजार समितीकडे शुल्कापोटी कोट्यवधीची रक्कम जमा होते. त्यातील काही रक्कम बाजार समितीसाठी खर्च केली जाते; तर उर्वरित रक्कम जास्त व्याजदर देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात गुंतवण्यात येते. याबाबतची माहिती असलेल्या सुमन शर्माने युको बँकेचा पनवेल शाखेचा व्यवस्थापक असल्याचे भासवून जून २०२२ मध्ये बाजार समितीवरील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या वेळी समितीने ५४ कोटी २८ लाख ३७ हजाराची रक्कम मुदत ठेवीमध्ये ठेवण्यासाठी दिली होती. मात्र, ही रक्कम बँकेतील बनावट खात्यात घेऊन अपहार केला होता. तसेच मुदत ठेवीच्या बनावट पावत्या बाजार समितीला दिल्या होत्या; पण एप्रिलमध्ये ५४ कोटी २८ लाखांच्या मुदत ठेवींपैकी १८ कोटी रकमेच्या ठेवीची मुदत संपल्यामुळे पुनर्गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव बाजार समितीसमोर आला. मात्र, समितीचे अध्यक्ष निकम यांनी कॅनरा बँकेतील समितीच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे.
------------------------------------
दोन वर्षांपासून फसवणूक
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमन शर्मा गेली दोन वर्षे बाजार समितीवरील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना भेटत होता. संशय येऊ नये, यासाठी स्वत: बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन धनादेश स्वीकारत होता. तसेच मुदत ठेवीच्या पावत्या व प्रमाणपत्र स्वतः देत होता. त्यामुळे बाजार समितीवरील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा त्याने विश्वास संपादन केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com