महावितरणची कालबाह्य वीज वितरण व्यवस्था

महावितरणची कालबाह्य वीज वितरण व्यवस्था

जुनाट वाहिन्यांमुळे महावितरणला ग्रहण
खंडित वीजपुरवठ्यामुळे पनवेलकर त्रस्‍त


पनवेल, ता.११ (बातमीदार) ः पावसाळापूर्व कामांसाठी महापालिका, आपत्ती व्यवस्‍थापन यंत्रणा, सिडको प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र महावितरणकडून होणारी कामे दर्जाहीन असल्‍याचे समोर येत आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात वारंवार बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. विजेअभावी पंप सुरू होत नसल्‍याने अनेक गृहसंकुलात पाणी समस्‍या उद्‌भवत आहेत.
पनवेल शहराबरोबरच सिडको वसाहती, नैना क्षेत्रामध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर एमएमआरडीएचे प्रकल्‍पही सुरू आहेत. लोकवस्‍ती वाढत असल्‍याने दिवसेंदिवस विजेची मागणीही वाढत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो घरांची निर्मिती सिडको करत आहे. याशिवाय बाजूला एमआयडीसी आणि छोटे मोठे उद्योग सुरू आहेत. त्‍यामुळे विजेची मागणी आणि उपलब्धता यांच्यात सांगड घालताना महावितरणला कसरत करावी लागते.
पनवेल परिसरातील बहुतांश वीज वाहिन्या जुनाट झाल्‍या आहेत. त्‍यामुळे कुठे ना कुठे तांत्रिक बिघाड होऊन सतत बत्ती गुल होण्याच्या तक्रारी वाढल्‍या आहेत. याशिवाय असह्य उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. औद्योगिक क्षेत्र, होऊ घातलेले राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय प्रकल्‍पांमुळे अखंडित वीजपुरवठा करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे राहिले आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाकडून उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने पनवेल परिसरात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

ओव्हरहेड वीज वाहिन्या
पनवेल परिसरात विशेषतः सिडको वसाहतीत ओव्हरहेड वीज वाहिन्या आहेत. त्या अद्याप भूमिगत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ऊन, वारा आणि पावसामध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. पक्षी वीज वाहिन्यावर बसले तरी बत्ती गुल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे पनवेल परिसरामध्ये अखंडित वीज पुरवठा करण्यामध्ये अडचणी येत आहेत.

नूतनीकरणासाठी हात आखडता
मागेल त्‍याला वीज दिली जात असल्‍याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्‍या तुलनेत पुरवठा तसेच वीज निर्मिती क्षमता वाढलेली नाही. महावितरणकडून पनवेल परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आवश्यक तितकेच कामे केले जातात. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेचे खांब, रोहित्र, त्‍याचबरोबर डिपी बदलण्यात येत नाहीत.

उघड्या विजेच्या डीपी
पनवेल शहरासह, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे त्याचबरोबर खारघर आणि इतर ठिकाणच्या डीपी, केबल्‍स खुल्‍या आहेत. त्यामुळे वारंवार शॉर्टसर्किट होतेच त्याचबरोबर रस्त्यालगत पिलर असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे.

पावसाळी नाल्यामध्ये वीजवाहिन्या
सिडकोच्या पावसाळी नाल्यामध्ये वीज वाहिन्या टाकल्याने नाले साफसफाई करताना संबंधित कामगारांना धोका निर्माण होतो. त्याचबरोबर त्यांच्या दुरुस्तीतही अडचणी निर्माण होतात. सुनियोजित शहर वसवताना अशाप्रकारे पावसाळी गटारांमध्ये विजेच्या वाहिन्या टाकणे घातक आहे. परंतु महावितरण आणि सिडकोकडून याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

ठाणा नाक्यावरील उपकेंद्राला विलंब
ठाणा नाका येथे महापारेषणकडून उच्च दाबाचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे उपकेंद्र महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर येथून खांदा वसाहत आणि पनवेलला वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी दोन वर्ष विलंब लागला आहे. ते अद्यापही कार्यान्वित केलेले नाही. त्‍यामुळे पनवेलसह खांदा वसाहतीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. रोडपाली येथील उपकेंद्र सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही.


कामोठे उपकेंद्र अद्याप कागदावर
कामोठेत एकच उपकेंद्र असून दुसरे प्रस्तावित आहे. त्यासाठी सिडकोने जागा आरक्षित ठेवले आहे. परंतु आवश्यक रक्कम प्राधिकरणाकडे महावितरणने वर्ग केलेली नाही. त्यामुळे हे वीज उपकेंद्र रखडले आहे. त्यासाठी आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.

कामोठे वसाहत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टिकोनातूनही या वसाहतीला अधिक प्राधान्य दिले जाते. परंतु विजेच्या समस्याने कामोठेला ग्रासलेले आहे. बारा बारा किंवा त्याहून अधिक तास वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे वीज ग्राहकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नाहीत. यासंदर्भात महावितरणने उपाययोजना कराव्यात, अशी वीज ग्राहक म्हणून आमची मागणी आहे.
- प्रमिला आहेर, कार्याध्यक्ष, जय हरी महिला मंडळ, कामोठे

होऊ घातलेल्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मात्र शहरातील लोक वीजसमस्‍येमुळे हैराण आहेत. पावसाळ्‌यात तर ही समस्‍या खूपच गंभीर होते.
- चंद्रकांत राऊत, संस्थापक, एकता सामाजिक सेवा संस्था, रोडपाली

..................

वीजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्‍त
नवी मुंबई युवक कॉग्रेसकडून महावितरणला निवेदन

वाशी, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. त्‍यामुळे नागरिकांकडून महावितरणविरोधात संताप व्यक्‍त होत आहे.
पावसाळा सुरू झाला असून खंडित विजेची समस्‍या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी वाशी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून विजेच्या समस्‍या सोडवण्याबाबत निवेदन दिले. सात दिवसांत उपाययोजना न केल्‍यास जनआंदोलनाचा इशाराही म्‍हात्रे यांनी दिला.
नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ‘काही तरी कर, नवी मुंबईकर’ ही लोकचळवळ राबवण्यात आली असून चळवळीच्या माध्यमातून शहरात चौकसभाही घेण्यात आल्या आहेत. ऐरोली, घणसोली व कोपरखरणे विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या असल्याने नागरिकांच्या तक्रारीचा पाढा मंगळवारी महावितरणच्या अधिकाऱ्यासमोर वाचण्यात आल्या. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, युवक काँग्रेसचे सचिव प्रणित शेलार, उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावले, सुरेश मानवतकर, सूर्यकांत निवडूंगे, किरण म्हात्रे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महावितरणकडे केलेल्या मागण्या
- रबाळे पोलिस ठाण्यासमोर बसवलेले उपकेंद्र कार्यान्वित करावे.
- ऐरोली उपविभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यावर ताण पडत असल्यामुळे या कार्यालयास ऐरोली विभागीय कार्यालय घोषित करण्यात यावे.
- घणसोलीत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावे.
- घणसोलीत महावितरणच्या तीन शाखा कराव्या.
- जुन्या फिडर पिलरच्या जागी नवीन फिडर पिलर बसवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com